भाजप युवा मोर्चाच्या शहर अध्यक्षाविरुद्ध सावकारकीचा FIR दाखल

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप युवा मोर्चाचे पंढरपूर शहर अध्यक्ष विदूल पांडुरंग अधटराव (रा. संतपेठ, पंढरपूर) यांच्याविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी छापा टाकून त्यांच्या घराची झडती घेतली असता, घरामध्ये 48 चेक, सावकारकीचा हिशोब लिहिलेल्या 9 वह्या, कोरे स्टॅम्प, चेकबुक्स, बँक पासबुक्स यासह 29 हजार 340 रुपयांची रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

विदूल अधटराव यांच्या विरोधात खासगी सावकारीची तक्रार पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहेत. यानुसार पोलिसांनी विदूल अधटराव यांच्या घरावर छापा टाकून घराची तपासणी केली. ही तपासणी प्रदीप भानुदास सावंत (सहकार अधिकारी श्रेणी-1) यांच्या समक्ष पोलिसांनी केली. यावेळी पोलिसांना दस्तावेजासह रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. खासगी सावकार विदूल अधटराव आणि त्याच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत असून, त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून आणखी खासगी सावकारीची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पंढरपूर शहर पोलिसांनी विदूल अधटराव याच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 39,45 सह भा.दं.वि. कलम 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत, पोलीस कर्मचारी गोविंद कामतकर, सुनील पवार, नीता डोकडे यांनी केली आहे.