काय सांगता ! होय, चंद्रकांत पाटलांच्या गावात भाजपची चक्क काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूकीची घंटा वाजल्यापासूनच अनेकांनी प्रचार करण्यास सुरुवात केली. सध्या राज्यात तिन्ही पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडी सत्तेत आहे. तर विरोधात असणारी भाजप (BJP) असे राजकीय चित्र असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्याच गावात शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने (BJP) चक्क काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली आहे. या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राज्यभरात गावागावात राजकीय रणधुमाळी सुरू आहे. सोमवारी माघारीची मुदत संपल्याने प्रत्येक गावातील चित्र स्पष्ट झाले आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर या गावातील युतीची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी विरोधात भाजप असे राजकीय चित्र असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या या गावात मात्र भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष शिवसेनेविरोधात एकत्र आले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी आता प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. गावागावात पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला अधिक महत्त्व असते. यामुळे विधानसभा आणि लोकसभेला अडचण नको म्हणून आमदार, खासदार या निवडणुकीत फारसे लक्ष घालत नाहीत. यामुळे गावागावात सोयीच्या आघाड्या करून निवडणुका होतात. कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर या गावातही अशीच सोयीची आघाडी झाली असून त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भुदरगड तालुक्यातील या गावात सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे हे गाव. या गावात दोन तीन महिन्यात अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी गट बदलले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख असलेले प्रवीण सावंत भाजपमध्ये गेले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते भाजपवासी झाले. यातून गावात राजकीय चुरस निर्माण झाली. शिवसेनेला रोखण्यासाठी मग भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची मदत घेतली. यामुळे या गावात भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली. त्यांच्या विरोधात आता शिवसेना लढणार आहे.

प्रकाश आबीटकर हे जिल्ह्यातील शिवसेनेचे सध्या एकमेव आमदार आहेत. चंद्रकांत पाटील विधानसभा निवडणूक राधानगरी मतदार संघातून लढविणार असल्याची चर्चा दोन वर्षापूर्वी होती. त्यातून आबीटकर व पाटील यांच्यात वादाला तोंड फुटले होते. आबिटकरांनी त्यांना लढून दाखवा असे आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर दोघातील राजकीय अंतर वाढले होते. आता दादांच्या खानापूर गावातील भाजपने आबिटकर गटाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीच मदत घेतल्याने निकालाची उत्सुकता वाढली असून, सर्वांचेच लक्ष आता या निवडुकीकडे लागले आहे.