अजित पवारांविरोधातील हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्षांनी स्वीकारला

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असून अनेक विकासकामांबाबत वादळी चर्चा होत आहे. दरम्यान वित्तमंत्री अजित पवार यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून त्यांच्याविरुद्ध भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हक्ककभांगाची सूचना मांडली. विशेष म्हणजे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ती स्वीकारल्याचे जाहीर केले. मागील अधिवेशनात अजित पवार यांनी वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. ते आश्वासन पाळले नाही म्हणून त्यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणला आहे.

यासंदर्भात बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्याचा सर्वंकष विकास साधायचा असेल तर वैधानिक विकास मंडळ आवश्यक आहे. मात्र राज्‍य सरकार यादृष्‍टीने गंभीर नसून ही अतिशय चिंतेची बाब आहे. या विभागावर निधी वितरणासंदर्भात अन्‍याय होण्‍याची शक्‍यता आहे. मागील विधानसभा अधिवेशनात वैधानिक विकास मंडळे स्‍थापन करण्‍याबाबत उपमुख्‍यमंत्र्यांनी दिलेले आश्‍वासन पाळले नाही. ही मंडळे स्‍थापन न करणे हा सभागृहांच्‍या सार्वभौम विशेषाधिकाराचा भंग असल्‍याचे सांगत हे प्रकरण विधानसभेच्‍या विशेष हक्‍क समितीकडे पाठविण्‍याची मागणी त्यांनी यावेळी केली.

आरोग्य विभागाच्या ३२३ रुग्णालयांचे फायर ऑडिट
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांच्या फायर ऑडीटचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्या संदर्भात सदस्य अतुल भातखळकर यांनी लेखी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागाच्या ५६७ रुग्णालयांपैकी ३२३ आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट झाले असून, १७० संस्थांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंदाज आराखडे तयार करण्यासाठी मागणी केली आहे. त्यातील ७४ अंदाज आराखड्यांसाठी जिल्हा नियोजन समिती व राज्यस्तरावरून निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू त्यांनी सांगितले.