हेमा मालिनीनं केला दावा, कुणाच्या तरी सांगण्यावरून शेतकरी करीत आहेत ‘आंदोलन’, खरा मुद्दा त्यांना माहितच नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार हेमा मालिनी यांनी शेतकरी चळवळीबद्दल भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या आहेत की शेतकऱ्यांना या गोष्टीबद्दल माहीतच नाही की नवीन शेतकरी विधेयकाबद्दल त्यांना काय अडचण आहे? तसेच त्यांनी असे देखील म्हटले की, शेतकऱ्यांना काय हवे आहे हेच त्यांना माहित नाही? त्या म्हणाल्या की कुणाच्या तरी सांगण्यावरून हे आंदोलन सुरू आहे. हेमा मालिनी मथुराच्या खासदार आहेत. त्या पुढे म्हणाल्या, केंद्र सरकार शेतकर्‍यांचे प्रश्न ऐकून तोडगा काढण्यास उत्सुक आहे पण शेतकऱ्यांना या विषयावर चर्चा करण्याची इच्छाच नाही.

हेमा मालिनी पुढे म्हणतात, ‘शेतकरी बसून बोलण्यास तयार नाहीत आणि त्यांना खरा मुद्दा माहित नाही’. खरं तर काही शेतकरी राजधानी दिल्लीत शेतकरी बिलाबाबत आंदोलन करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की शेतकरी कायद्यामुळे ते बड्या उद्योगपतींच्या अधिपत्याखाली येतील. या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने पुढील आदेशापर्यंत शेतकरी विधेयक लागू करण्यावर बंदी घातली आहे.

याशिवाय सुप्रीम कोर्टाने शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातील खटला मिटविण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. हेमा मालिनी एका मुलाखतीत म्हणाल्या, ‘सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ते शांत व्हावेत यासाठी ते आवश्यक होते. जो कोणी बोलायला येतो तो योग्य ते मान्य करायला तयार नाही आणि त्यांना काय हवे आहे हेदेखील त्यांना ठाऊक नाही. या विधेयकामध्ये काय अडचण आहे, हेदेखील त्यांना माहित नाही. याचा अर्थ असा आहे की लोक हे एखाद्याच्या सांगण्यावरून सगळं काही करत आहेत. यामुळे पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, आमचे सरकार नेहमी सांगत आहे की लोकांनी यावं आणि त्यांना काय हवं आहे ते सांगावं परंतु त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही.

दरम्यान चित्रपट अभिनेता धर्मेंद्र यांनी शेतकर्‍यांच्या बाजूने ट्विट केले होते. त्यांनी लिहिले होते की, ‘शेतकरी बांधवांचा त्रास पाहून मला वाईट वाटत आहे. सरकारने लवकरच काहीतरी करावे.’