बॉलिवूडची CM ठाकरेंकडे पत्राद्वारे मागणी, म्हणाले – ‘पुन्हा Lockdown नको’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत आहे. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर येत्या एक-दोन दिवसात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिला आहे. आता यावर बॉलिवूडच्या कलाकारांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने शुक्रवारी (दि. 2) मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आता पुन्हा लॉकडाऊन न लावण्याची विनंती केली आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने मुख्यमंत्र्याना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या वेळी लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले. या क्षेत्रातील लाखो कामगारांवर तसेच कलांकारावर बेरोजगारीची वेळ आली आहे. आता पुन्हा जर लॉकडाऊन केले तर या क्षेत्रातील सर्वानाच मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. तसेच फिल्म इन्डस्ट्रीवर मोठं संकट येईल, असे या पत्रात म्हटले आहे. गेल्यावेळी कोरोना काळात अनेक निर्मांत्यांनी कलाकारांनी बेरोजगारीचा सामना करणा-या कामगारांना आर्थिक मदत केली. त्यामुळे अनेकांना आधार मिळाला. पण आता यावेळी निर्माते आणि कलाकार अशा परिस्थितीत आहेत की ते कुणालाही आर्थिक मदत करू शकणार नाहीत. त्यामुळे या वेळी पुन्हा लॉकडाऊन लागला तर परिस्थिती बिघडण्याची शक्यता असल्याचे पत्रात म्हटले आहे. गेल्यावेळी लॉकडाऊनमध्ये ज्यांनी आपली नोकरी, काम गमावले त्यांना अद्यापही काम मिळाले नाही. त्यामुळे आता ज्यांना काम मिळाले आहे, त्यानाही आपला रोजगार गमवावा लागेल. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लावू नये, असे या पत्रात म्हटले आहे.