प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या जामीनावरील सुनावणी २७ पर्यंत स्थगीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपुर्व जामीनाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने २७ तारखेपर्यंत स्थगीत केली आहे. तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने २२ तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. आज सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने याची सुनावणी २७ तारखेपर्यंत स्थगित केली आहे.

आनंद तेलतुंबडे यांच्यावर बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून एल्गार परिषदेसंदर्भात असलेल्या दाखल गुन्ह्यात आरोपी केले आहे. त्यानंतर तेलतुंबडे यांनी उच्च न्यालालय व सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ११ फेब्रुवारीपर्यंत सक्षम न्यायालयात जामीनासाठी अर्ज करायला सांगितले होते. तसेच त्यांना अटकेपासून सरंक्षण दिले होते़. त्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज १ फेब्रुवारी रोजी फेटाळला. त्यावेळी २ फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी अटक केली. परंतु न्यायालयाने त्यांना केलेली अटक बेकायदा ठरवत त्यांना सोडून देण्याचे आदेश दिले होते. याविरोधात पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पुणे पोलिसांचे म्हणणे ऐकून घेऊन तेलतुंबडे यांना १४ व १९ फेब्रुवारी रोजी पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश देऊन त्यावर २२ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार होती. त्यानुसार ते १४ आणि १९ फेब्रुवारी रोजी पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाले होते. त्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाकडून २७ तारखेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

एल्गार परिषदेचे आयोजन व माओवाद्यांशी संबंधांवरून त्यांच्यावर पुण्यात दाखल गुन्ह्यात दोनवेळा न्यायालयाच्या निर्देशनाचे ते पुणे पोलिसांसमोर दोनवेळा चौकशीसाठी हजर झाले होते. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली.