मांडुळ विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोशी येथील काळजे पेट्रोल पंपाजवळ मांडुळ विक्रीसाठी आलेल्या दोघांना भोसरी एम आय डी सी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ लाख रुपये किंमतीचे मांडुळ जप्त करण्यात आले आहे.

हेमंत संजू पवार (रा. शिवाजीनगर कामगार पुतळा, पुणे) आणि आकाश बापू वाघमारे (रा. बीटी कवडे रोड, शिर्के कंपनीसमोर, भीमनगर झोपडपट्टी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांवर वन्य प्राण्यांची तस्करी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अभय महादेव भवारी (वय २८ , रा. सी डब्ल्यु पी. आर सी एस कॉलनी, किरकटवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. वन्य सरंक्षण कायद्याअंतर्गत शेड्युल ३ मध्ये मांडुळ विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मांडुळ विक्रीसाठी दोघे जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी रात्री त्यांनी पुणे नाशिक रोड येथील काळजे पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. मिळालेल्या वर्णनानुसार दोघे जण तेथे घुटमळताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तपासणी केली तर त्यांच्याकडे एक मांडुळ आढळून आला. हे मांडुळ अंदाजे ३६ इंच लांब व ६ इंच गोलाईचे असून त्याचे वजन अडीच किलो आहे.

मांडुळ विना परवाना विक्रीसाठी जवळ बाळगल्याबद्दल पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.