‘त्या’ प्रकरणात झील कॉलेजच्या प्राचार्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – संचालकाच्या पत्नीने आपला एमईचा पेपर एका प्राध्यापकाकडून सोडवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील नऱ्हे येथील झील एज्युकेशन सोसायटीच्या झील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च महाविद्यालयात घडल्याचे उडकीस आला आहे. याप्रकरणी झील एज्युकेशन सोसायटीच्या संचालकाच्या पत्नीसह महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापकावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १२ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१७ दरम्यान झील कॉलेजच्या परिक्षा केंद्रावर घडला.

महाविद्यालयाचे प्राचार्य़ अजित काटे, प्राध्यापक अनुराग जैन आणि संचालकांच्या पत्नी स्नेहल सुरेश जगताप यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. प्रसाद विष्णू कुलकर्णी (वय- ४५) यांनी सिहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
झील एज्युकेशन सोसायटीचे संचालक जयेश काटकर यांच्या पत्नी स्नेहल जगताप एमईचे शिक्षण घेत आहेत. डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या परिक्षेमध्ये स्नेहल जगताप यांनी पहिल्या वर्षाचा पेपर दबाव टाकून सोडवून घेतला.

जगताप यांनी परिक्षेमध्ये स्वत:च्या हस्ताक्षरात उत्तरपत्रिका न सोडवता त्या प्राध्यापक अनुराग जैन यांच्याकडून लिहून घेतल्या. यावेळी जगताप परिक्षा हॉलमध्ये न बसता प्राचार्य़ांच्या केबीनमध्ये बसून होत्या. याप्रकरणात याप्रकरणात स्नेहल जगताप यांना महाविद्यालयाचे प्राचार्य अजित काटे यांनी मदत केली असल्याची फिर्य़ाद प्रसाद कुलकर्णी यांनी केली आहे. कुलकर्णी यांच्या फिर्य़ादेवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील करित आहेत.