Latur News : सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयाला जन्मठेप, लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तीन वर्षापूर्वी काैटुंबीक वादातून सास-याचा भर चौकात कोयत्याने खून करणा-या जावयास लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय.पी. मनाठकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

पुंडलिक गाेविंद काळे (वय 26) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या जावयाचे नाव आहे. व्यंकट भीमराव नंदगावे (वय 46) असे खून तीन वर्षापूर्वी खून झालेल्या सास-याचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, चाकूर तालुक्यातील राचन्नावाडी येथील व्यंकट भीमराव नंदगावे (वय 46) यांच्या मुलीचा देवणी तालुक्यातील पंढरपूर येथील पुंडलीक गाेविंद काळे याच्याशी विवाह झाला होता. दरम्यान जावई पुंडलीक हा मुलगी जनाबाई हिला सतत छळत हाेता. त्यामुळे जावई आणि सासऱ्यामध्ये सतत वाद हाेत हाेते. व्यंकट नंदगावे हे 15 जुलै 2018 राेजी दुसऱ्या मुलीच्या विवाह स्थळासाठी भातांगळी येथे गेले हाेते. तेथून परतत असताना चाकूर येथील बोथी चौकात जावायाने त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करुन खून केला. हल्ल्यानंतर रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या व्यंकट नंदगावे यांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी चाकूर पाेलीसात गुन्हा दाखल केला होता. जावई पुंडलिक गाेविंद काळे याला अटक करून पाेलीस निरीक्षक रामेश्वर तट, एस.बी. आरदवाड यांनी करुन लातूर येथील न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. सदरचा खटला लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश वाय.पी. मनाठकर यांच्या समाेर चालला. प्रत्यक्षदर्क्षी साक्षीदाराची साक्ष गृहीत धरुन आराेपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी एकूण 9 साक्षीदारांच्या साक्ष झाल्या असून, त्या महत्वपूर्ण ठरल्या. या खटल्याचे कामकाज जिल्हा सरकारी वकील संताेष देशपांडे यांनी काम पाहिले.