ज्योतिषांनी दिला येडियुरप्पांना कानमंत्र ; काय आहे येडियुरप्पांचे १९-१९-१९ लोटस ऑपरेशन

बंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटकच्या राजकारणात मकर संक्रांतीपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. कर्नाटकच्या एका स्थानिक ज्योतिषाने येडियुरप्पा हे नक्कीच मुख्यमंत्री होणार आहेत, असे भाकित केले होते. त्यावरुन येडियुरप्पा यांनी देखील मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न रंगवने सुरू केले आहे. मकर संक्रांतीला म्हणजेच १५ जानेवारीला त्यांनी काँग्रेसच्या काही आमदारांचे अपहरण केले होते आणि त्यांना हरियाणा येथील एका लॉजवर लपवून ठेवले होते, असा आरोप काँग्रेसने केला होता. त्यावरुन ते काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता स्थापन करणार आहेत, म्हटले जात आहे. संक्रांतीनंतरचा काळ सत्ता हस्तगत करण्यास अनुकूल असल्याचे ज्योतिषाने सांगितल्याने येडियुरप्पा कडून पुन्हा एकदा आमदार फोडण्याचा प्रयत्न होण्याचे संकेत मिळत आहेत.

१९-१९-१९ लोटस ऑपरेशन
इतर राजकारण्यांप्रमाणे येडियुरप्पांचा ज्योतिष शास्त्रावर मोठा विश्वास आहे. त्यासाठी १९-१९-१९ चे लोटस ऑपरेशन ते चालवणार आहेत. येडियुरप्पा स्वतःही म्हणतात, की त्यांचा संपर्क काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याशी आहे. म्हणजेच, १९ तारखेला काँग्रेसचे १९ उमेदवार फुटतील आणि त्यांना सत्ता स्थापनेसाठी मदत करतील, असा या ऑपरेशन लोटसचा अर्थ लावला जात आहे.

कर्नाटकमध्ये विधानसभेच्या २२५ जागा आहेत. तेथे जनता दल सेक्युलर, काँग्रेस आणि बसपने मिळून सरकार स्थापन केली आहे. भाजपने तेथे १०४ जागा जिंकल्या होत्या. सरकार स्थापन करण्यासाठी ११२ जागांची आवश्यकता असते. जर भाजपला सरकार स्थापन करायचे असेल तर, निदान १९ अधिक जागांची त्यांना आवश्यता आहे. कारण आघाडी सरकारजवळ एकूण ११८ जागा आहेत. त्यासाठीच १९ तारखेला येडियुरप्पा ऑपरेशन लोटस चालवणार आहेत.