साखरपुड्याला जाणाऱ्या खासगी बसचा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात

मावळ/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई येथून सांगली येथे साखरपुड्यासाठी जाणाऱ्या एका खासगी बसचा भीषण अपघात (Major Accident) झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या अपघातात 25 जण जखमी झाले असून तीनजण गंभीर असल्याचे प्राथमिक वृत्त असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात आज (रविवार) दुपारी बाराच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावरील (Mumbai-Pune Express way) किवळे एक्झिटजवळ (Kivale Exit) झाल्याचे समजतय.

मिळालेल्या माहिनुसार, मुंबई येथील शहापूरहून सांगलीकडे निघालेल्या बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. भरधाव वेगात असणारी बस उलटली. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 40 प्रवासी प्रवास करत होते. अपघातात 25 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतय. जखमी रुग्णांवर नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर बस चालक बस घटनास्थळी सोडून पळून गेला आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, देहू रोड पोलीस, देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य सुरु केले. तसेच जखमींना तातडीने महामार्गालगतच्या तीन रुग्णालयात दाखल केले आहे.