व्यावसायिकानं 9 लाखात विकत घेतला ‘करामती बल्ब’, गुपित बाहेर येताच बडवून घेतलं डोकं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दिल्लीच्या एका व्यावसायिकाला बरेलीमध्ये काही ठगांनी जादुई बल्बच्या नावाखाली 9 लाख रुपयांचा चुना लावला. खरं तर, तीन तरुणांनी एका व्यावसायिकाला कथितपणे 9 लाखात करामती (जादुई) बल्ब विकला. ठगांनी व्यावसायिकाला सांगितले की या बल्बच्या माध्यमातून त्याच्या घरात सोन्यासारख्या महागड्या धातूंची प्राप्ती होईल आणि त्याच्या घरात भरभराट होईल.

आरोपी लखीमपूर खेरी येथील रहिवासी आहेत. आरोपीने स्पेशल मॅग्नेटद्वारे विविध प्रकारे बल्ब पेटवून व्यावसायिकाचा विश्वास जिंकला आणि नंतर तो 9 लाख रुपयांना विकला आणि तेथून पळ काढला. कोरोना विषाणूच्या साथीमुळे त्या व्यावसायिकाचे नुकसान झाले होते, त्यामुळे सहजपणे पैसे कसे कमवता येतील याच्या शोधात तो होता. हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा तिन्ही आरोपी- छुटकन खान, मासूम खान आणि इरफान खान यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. त्याचवेळी पीडित व्यावसायिक आणि फिर्यादीचे नाव नितेश मल्होत्रा असल्याचे समजले.

इंग्रजी वृत्तपत्र ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, तिघांपैकी एका आरोपीने मल्होत्राला ‘करामती’ बल्ब विकत घेण्यासाठी सांगितले. पीडित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार आरोपीने सांगितले की हा बल्ब समृद्धी प्रदान करेल. मल्होत्राला आरोपीच्या हेतूवर शंका आली नाही आणि तो बल्ब त्याने 9 लाखात विकत घेतला, जो की एक सामान्य बल्ब निघाला.

या संदर्भात खेरीचे एसएसपी विजय ढुल म्हणाले, इरफानवर अर्धा डझन फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी, त्याच्यावर एका निष्पापची फसवणूक आणि खंडणीखोरी करण्याच्या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यावर्षी ऑक्टोबरमध्ये दोन लोकांनी कथितपणे मेरठमध्ये लंडनहून परत आलेल्या एका डॉक्टरला अडीच कोटीं रुपयांमध्ये ‘अलादीनचा चिराग’ विकला होता.