कर्नाटकच्या 15 जागांवर पोटनिवडणूक रद्द होणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आमदारांच्या अपात्रतेला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी प्रलंबित राहिल्याने कर्नाटकच्या 15 जागांवर पोटनिवडणूक रद्द होईल, असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. कर्नाटकातील 17 अपात्र आमदारांनी 21 ऑक्टोबरला पोटनिवडणूक घेण्याची परवानगी मिळावी यासाठी अंतरिम आदेश किंवा निर्देश मागवून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 22 ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

कर्नाटकातील जनता दल आणि काँग्रेसच्या सतरा आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांचे निलंबन झाले होते. त्या निलंबनाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र याचिकेकडे लक्ष न देता केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली होती. मात्र आता आमदारांच्या अपात्रतेला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी प्रलंबित राहिल्याने कर्नाटकच्या 15 जागांवर पोटनिवडणूक रद्द होईल, असे निवडणूक आयोगानेच सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याबरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटकातील पोटनिवडणुकांची देखील तारीख जाहीर केलेली आहे. कर्नाटक राज्यातील एकूण 17 आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यापैकी 15 जागांवर निवडणूक होणार होती. कर्नाटक राज्यातील गोकाक, अथणी, कागवाड, शिवाजीनगर, महालक्ष्मी लेआउट, विजयनगर, यशवंतपूर, के. आर. पूर, होसकोठें, चिक्कबल्लापूर, हिरेकरूर, हनसुरु, के.आर.पेठे, राणीबेन्नूर या ठिकाणी मतदान होणार होते. मात्र आता ते रद्द होण्याची शक्यता आहे.

Visit : policenama.com