CAA च्या विरोधातील वाद विकोपाला, 75 वर्षाच्या वृध्दानं भर चौकात स्वतःला जिवंत जाळलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CAA आणि NRC विरोधात इतर राज्यांमध्ये चांगलाच वाद पेटल्याचे दिसून येत आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या एका वयोवृद्ध सदस्याने शुक्रवारी सीएए आणि एनआरसीच्या निषेधार्थ स्वत: ला पेटवून घेतले आहे. यानंतर घटनास्थळी असलेल्या लोकांनी त्या व्यक्तीला ताबडतोब महाराज यशवंतराव रुग्णालयात दाखल केले. रमेश प्रजापत (75) असे त्या व्यक्तीचे नाव असून द्वारकापुरी येथील ते रहिवासी आहेत.

गीता भवन चौकाजवळ रमेश प्रजापत यांनी स्वत: ला आग लावून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर जवळपासच्या लोकांनी त्यांना कसे तरी वाचवले. पोलिसांना कळवल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली गेली. प्रजापत गेल्या अनेक वर्षांपासून कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश यांत्या खिशातून पोलिसांना सीएएशी संबंधित काही पत्रकेही मिळाली आहेत. रमेश प्रजापत यांनी स्वत: ला का पेटवून घेतले याविषयी अद्याप कोणतीही ठाम माहिती मिळाली नाही.

रमेश यांच्या नजीकच्या एका व्यक्तीने सांगितले की, रमेश प्रजापत गेल्या अनेक वर्षांपासून कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत. जामा मशिदीत सध्या सुरू असलेल्या सीएएच्या निषेधांमध्येही त्यांचा सहभाग होता. त्याशिवाय सीएएचा निषेध करण्यासाठी रमेश प्रजापत आणि त्यांच्या कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांनी शहरातील विविध वस्त्यांमध्ये लोकांना भेटले होते. पोलीस त्यांच्या व कुटूंबियांची जबाब नोंदवित आहेत आणि या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे सीएए मुद्द्याने पेट घेतला असल्याचे दिसून आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –