महाराष्ट्रातील धक्कादायक घटना ! कोविड सेंटरमध्ये दारू अन् गांजा पार्टी, कर्मचार्‍यांकडून व्हिडीओ काढणार्‍याला बेदम मारहाण

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – कोविड सेंटरमधील कर्मचारीच सेंटर परिसरात दारु, गांजा पार्टी करत असल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. दारू, गांजा पिणाऱ्या या कर्मचाऱ्यांना एका तरुणाने मज्जाव करून त्यांचा व्हिडिओ काढला. मात्र याचा राग मनात धरून कर्मचाऱ्यांनी त्या तरुणालाच बेदम मारहाण केली आहे. या प्रकारामुळे कोविड सेंटरमधील गैरप्रकार उघडकीस आला आहे. ही बाब कळताच कोविड सेंटर प्रशासनाने त्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे.

डोंबिवली क्रीडा संकुलात महापालिकेचे कोविड सेंटर आहे. हे कोविड सेंटर एका कंत्राटदारास चालवण्यास दिले आहे. कोविड सेंटरच्याजवळ तांत्रिक कर्मचारी वर्गासाठी एक शेड उभारला आहे. याच शेडमध्ये बसून काही कर्मचारी दारू, गांजा पार्टी करत असल्याची बाब राजू आलम या तरुणाच्या लक्षात आली. राजू आलम हा एसी दुरुस्तीचे काम करतो. त्याने कर्मचाऱ्यांना दारू पिण्यास मज्जाव केला. ते दाद देत नसल्याने त्याने त्यांचा व्हिडीओ काढला. दारु गांजा पिणाऱ्या कर्मचाऱ्यांनी राजूलाच बेदम मारहाण केली. दरम्यान सेंटरमधील कामाची वेळ संपल्यावर कर्मचाऱ्यांना आवाराच्या बाहेर काढले जाते असे सेंटर व्यवस्थापनाने सांगितले आहे.