वाहन चोरी करणार्‍याची अटकेच्या भितीनं आत्महत्या, नवी मुंबईमधील घटना

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवी मुंबई येथे महागड्या गाड्या कंपनीत भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून त्या परस्पर विकणाऱ्या टोळीचा कारनामा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. तर दोघां आरोपीना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक फरार आहे तसेच चौथ्याने आत्महत्या केली आहे. सुरज नारायण पाटील (वय,३४ रा. पुणे), जगदीश उर्फ चुंनीलाल चौधरी (वय,३३ रा.कोपरखैरणे) अशी अटक केलेल्यांची नावे असून, राजशेखर चिक्के गौडा हे आत्महत्या केल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, डेरवली येथील ज्ञानेश्वर पेढेकर यांची गाडी दरमहा १८ हजार रुपये भाड्याने लावून मारुती एरटिगा कार क्रमांक (MH-43 AN 4397) ही २०२० ऑगस्ट महिन्यात राजशेखर चिक्के गौडा याने नेलेली होती. सुरुवातीला त्यांना १-२ महिन्याचे भाडे मिळाले. परंतु, त्यानंतर भाडे न मिळाल्याने पेढेकर यांनी राजशेखर यांच्याकडे भाड्याची मागणी केली. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पेढेकर यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अशा प्रकारे अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

दरम्यान, पोलीस पथकाने ज्यावेळी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा, सुरज आणि जगदीश यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी सर्व वाहनांचे बनावट कागदपत्रे तयार करून विविध ठिकाणी विक्री केल्याची माहिती दिली. तसेच, पोलिसांच्या पथकाने नागपूर, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी जाऊन ४१ लाख ५० हजार रुपयांची १० वाहने हस्तगत केली. तर अटक केलेल्या दोन आरोपींवर डी बी मार्ग पोलीस ठाणे, मुंबई हद्दीत एका संगणक व्यवसायिकाला संगणकाचा साहित्यामध्ये १ कोटी १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे.