भय्युजी महाराजांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा : काँग्रेस

दिल्लीः वृत्तसंस्था

राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांनी आज (मंगळवार) दुपारी इंदूर या ठिकाणी आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांना इंदूरच्या बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. भय्युजी महाराजांच्या आत्महत्येमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात एक सुसाईट नोट देखील मिळाली आहे. त्यामध्ये त्यांनी मी ताण-तणावातून आत्महत्या करत असून, माझ्या आत्महत्ये बाबत कोणालाही जबाबदार धरुन नये असे म्हटलं आहे.

अशातच भय्युजी महाराजांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. भय्युजी महाराज यांच्यावर भाजपाने बरीच कामे सोपवली होती. ती पूर्ण करून घेण्यासाठी सारखा पाठपुरावा केला जात होता. त्याचमुळे भय्युजी महाराज तणावात होते असा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच मध्यप्रदेशातील शिवराज सिंह सरकारने आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा पुरवतो तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या अशी मागणी केली होती. या मागणीमुळे भय्युजी महाराज प्रचंड तणावाखाली होते असा आरोप काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांनी केला आहे.

राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांच्या निधनाच्या बातमीमुळे काॅंग्रेस पक्षातील प्रत्येकाला अतीव दुःख झाल्याचे ट्विट करण्यात आलं आहे. भय्युजी महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाज सेवेसाठी खर्ची केलं. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो असे देखील या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चाैहान यांनी देशातील संस्कृती, ज्ञान आणि समाजसेवा जपणारे व्यक्तीमत्व हरपले म्हणत शोक व्यक्त केला आहे. त्यांचे विचार आंम्हाला कायम प्रेरणा देतील असेही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते अशी माहिती समोर येते आहे.