CM ठाकरेंचा खास शिलेदार अडचणीत येण्याची शक्यता, ‘त्या’ मंत्र्याचीही लवकरच CBI चौकशी?

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. या प्रकरणात आता CBI ने देशमुख यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच देशमुख यांच्या घरासह त्यांच्या मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे येथील 10 मालमत्तांवर CBI ने छापे टाकले आहेत. दरम्यान देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेली कारवाई कायदेशीर असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. काही जण जात्यात तर काही जण सुपात आहेत, सगळ्यांचा हिशोब परमेश्वर करत असतो, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे देशमुख यांच्यानंतर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब अडचणीत येण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडून कायदेशीर कारवाई सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी या कारवाईला भाजपचे कारस्थान म्हटले आहे. त्यांचा हा आरोप हास्यास्पद आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आधी सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. आता उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार सीबीआयची कारवाई सुरू आहे. काही जण जात्यात आहेत. काही जण सुपात आहेत, असे पाटील यांनी म्हटले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने गंभीर आरोप केले आहेत. परब यांनी मला मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांना धमकावून त्यांच्याकडून 100 कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप वाझेने पत्रात केला आहे. त्यामुळे परब यांची चौकशी व्हायला हवी, असे पाटील म्हणाले.