CBI vs POLICE : सीबीआय सर्वोच्च न्यायालयात जाणार 

कोलकत्ता : वृत्तसंस्था – सीबीआय आणि पश्चिम बंगाल पोलीस यांच्यातील संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. शारदा चिटफंड घोटाळ्यात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर तेथील वातावरण तणावाचे बनले आहे.
सीबीआयचे हंगामी संचालक नागेश्वर राव यांनी  बंगाल पोलीस आम्हाला तपासात  सहकार्य करत नसल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली होती. त्यामुळे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याविरोधात आता आम्ही थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण-
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यातील वाद पुन्हा समोर आला आहे. रोझ व्हॅली आणि शारदा चिटफंड घोटाळ्यावरुन सीबीआयने कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकला.
मात्र पश्चिम बंगाल पोलिसांनी छापा मारणाऱ्या सीबीआयच्या सहा अधिकाऱ्यांनाच अटक करुन पोलीस स्टेशनमध्ये नेलं. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही कारवाई पंतप्रधान मोदी यांच्या इशाऱ्यावरुन केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, पोलिसांनी सीबीआय अधिकाऱ्यांना सोडले असून ममता बॅनर्जी यांनी मेट्रो सिनेमासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.
सीबीआयचे हंगामी संचालक एम. नागेश्वर राव यांनी ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच करण्यात आली असल्याचा दावा केला आहे. कोलकाता पोलीस चीटफंड घोटाळ्याच्या तपासात सीबीआयला सहकार्य करत नव्हते. या संबंधींचे पुरावे आणि कागदपत्रांची वारंवार मागणी करूनही पोलिसांनी आम्हाला ते दिले नाहीत. याउलट त्यांच्याजवळ असलेले महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यात आल्याचा आरोपही नागेश्वर राव यांनी केला.सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सीबीआयच्या वतीने  तुषार मेहता बाजू  मांडणार आहेत.