गडकरींना राग अनावर … म्हणाले ‘गप्प बसा… नाहीतर थप्पड खाल’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नितीन गडकरी यांची काल नागपुरात सभा आयोजित करण्यात आली होती . मात्र या सभेदरम्यान वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे काही समर्थक होते. या कार्यकर्त्यांनी भर सभेतच घोषणा द्यायला सुरुवात केली. तेव्हा मात्र केंद्रीय मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी चांगलेच भडकले. जर हे गोंधळ घालणार असतील तर यांना थप्पड लागवा .असे म्हणत त्यांनी आपला राग व्यक्त केला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , नितीन गडकरी यांनी काल नागपुरात आयोजित जाहीर सभेत भाषण सुरू केल्यानंतर उपस्थितांपैकी विदर्भ समर्थक कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. शिवाय उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिंधींच्या दिशेने पत्रकेही भिरकावली. हे पाहून गडकरी नाराज झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र कार्यकर्ते शांत होत नाहीत , हे पाहून गडकरींना राग अनावर झाला.

‘ते जर पुन्हा गोंधळ घालणार असतील, तर त्यांना थप्पड लगावा… लक्षात ठेवा, आरडाओरड बंद करा नाहीतर थप्पड खाल…! आणि तुम्हाला बाहेर काढण्यात येईल. त्यांना बाहेर काढा’, अशा शब्दांत गडकरी यांनी आपला राग व्यक्त केला. नागपुरातील एका जाहीर सभेत गडकरी यांनी आपला राग व्यक्त केला. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. मात्र, तरी देखील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली.