बॉलीवूडमधून आली धक्कादायक बातमी ! अभिनेत्री किरण खेर यांना झालाय ब्लड कॅन्सर, मुंबईत उपचार सुरू

चंडीगढ : वृत्तसंस्था – काँग्रेसने खासदार किरण खेर यांच्यावर मागील दिड वर्षापासून शहरातून बेपत्ता झाल्याचा आरोप करत आघाडी उघडली आहे. यानंतर चंडीगढ भाजपा अध्यक्ष अरुण सूद खासदार खेर यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. त्यांनी सांगितले की, खासदार किरण खेर सध्या मल्टीपल मायलोमा (प्लाझ्मा सेल्सचा कॅन्सर) आजाराने पीडित आहेत आणि सध्या मुंबईत उपचार घेत आहेत.

अरुण सूद यांनी सेक्टर-33 भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेत खासदार खेर यांचा बचाव करताना त्यांच्या आजाराचे कारण सांगितले. सूद म्हणाले, सध्या त्या धोक्याच्या बाहेर आहेत. सुरुवातीच्या स्टेजमध्ये आजाराचे निदान झाले. या आजाराच्या उपचारासाठी त्यांना अजूनही आठवड्यातून एकवेळा 24 तासांसाठी हॉस्पिटलमध्ये राहावे लागते. पुढील तीन ते चार महिने त्यांना रिकव्हर होण्यासाठी लागतील आणि त्यांनतर त्या चंडीगढच्या लोकांच्या सेवेसाठी पुन्हा येतील.

सूद म्हणाले, मागील वर्षी लागलेल्या लॉकडाऊन दरम्यान खासदार किरण खेर चंदीगडमध्ये होत्या. त्यावेळी डायबिटिक असल्याने त्यांना डॉक्टरांनी बाहेर न पडण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्या सातत्याने त्यावेळी सुद्धा प्रशासकीय अधिकारी आणि पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात होत्या. खासदार खेर वेळोवेळी शहराच्या कामासाठी सल्लागार आणि प्रशासक व्हीपी सिंह बदनौर यांच्याशी चर्चा करत आहेत.

राजीनामा देऊन करावा उपचार, लोकांनी का भोगायचे : काँग्रेस
काँग्रेस प्रवक्ते आणि नगरसेवक सतीश कैंथ यांनी म्हटले की, खासदार किरण खेर आजारी आहेत तर त्यांनी राजीनामा देऊन उपचार केले पाहिजेत. आपल्या आरोग्यापेक्षा राजकारण प्रिय असू नये. सध्या शहरात अनेक मुद्दे आणि समस्या वाढत चालल्या आहेत, ज्यासाठी खासदाराची आवश्यकता असते. खासदार शहरात नसल्याने त्याची झळ शहरवासीयांना भोगावी लागत आहे. आता अरुण सूद स्वत: सांगत आहेत त्यांना येथे येण्यास तीन ते चार महिने अजून लागणार आहेत.