चंद्रपूरमध्ये कुर्‍हाडीने वार करून तरुणाचा खून

पोलिसनामा ऑनलाईन टीम – चंद्रपूर(Chandrapur)मधील दाताळा परिसरातील ’सिनर्जी वर्ल्ड’ या सदनिका वसाहतीत तरुणावर कुर्‍हाडीने वार करून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मनोज अधिकारी असे खून झालेल्याचे नाव आहे. फ्लॅटमध्ये काहीजणांनी पार्टी केल्याचे पुढे आले आहे. त्यानंतर काही आरोपींनी मनोजचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

चंद्रपूर शहराच्या बंगाली कॅम्प परिसरात दोन टोळ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. जुन्या वादातूनच मनोज अधिकारी याचा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे भागाला छावणीचे स्वरूप आले आहे. मनोज अधिकारी याच्या हत्या प्रकरणातील काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याची माहिती आहे. त्यामध्ये एका महिलेचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. संपूर्ण हत्याप्रकरणात पोलीस मात्र बोलण्यास तयार नाहीत. शहरातील बंगाली कॅम्प भागातील तणावाची स्थिती बघता या भागात अधिक पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे.