‘रमजान ईद’निमित्त पुण्यातील वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहरात बुधवारी रमजान ईद मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी घराबाहेर पडत असल्यामुळे या काळात रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने पुणे वाहतूक विभागाने शहरातील वाहतूकीत बदल केले आहेत. त्यामुळे बुधवारी (दि.५) वाहनचालकांनी देण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी केले आहे.

पुण्यातील गोळीबार मैदान, इदगाह या ठिकाणी मुस्लिम बांधव नमाज पठण करीत असतात. त्यावेळी ईदगाहचे जवळपास मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होते. या ठिकाणी वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे चालण्यासाठी वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.

गोळीबार मैदान, इदगाह या ठिकाणी बुधवारी (दि.५) सकाळी सहा पासून नमाज पठण करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे नमाज पठण पूर्ण होईपर्य़ंत या ठिकाणी सर्व वाहनांना वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. या मार्गावरून जाणा-या वाहन चालकांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतुक शाखेने केले आहे.

बंद मार्ग व पर्यायी मार्ग खालील प्रमाणे

१) गोळीबार चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग हा नमाज पठणाच्या वेळी बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग – गोळीबार चौकातून डाव्या बाजूस वळून सीडीओ चौक उजवीकडे वळून गिरीधर भवनचौक पुढे उजवीकडेवळून सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जाणे.

२) सीडीओ चौक ते गोळीबार चौकाकडे येणारी वाहतुक नमाज पठण काळात सकाळी सात ते दहा या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग – लुल्लानगरकडून येवून खाण्या मारुती चौकाकडे जाणारी वाहतुक खटाव बंगाल चौक – नेपीयर रोड – मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार चौक – भैरोबानाला येथून किंवा गिरीधर भवन चौकातून इच्छित स्थळी जाणे.

३) सेव्हन लव्हज चौकाकडून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतुक बंद करण्यात येणार आहे.
पर्य़ायी मार्ग – सॅलेसबरी पार्क – सीडीओ चौक – भैरोबानाला येथून इच्छित स्थळी जाणे.

४) सोलापूर रोडने मम्मादेवी चौक येथे येणारी वाहतुक ही गोळीबार चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग – मम्मादेवी चौक बिशप स्कुल मार्गे किंवा कमांड हॉस्पिटल मार्गे डव्हर्शन करुन पुढे इच्छित स्थळी किंवा नेपअर रोडने पुढे सीडीओकडे जाणे.

५) भैरोबानाला ते गोळीबारकडे जाणारी वाहतुक भैरोबानाला येथे बंद करुन एम्प्रेस गार्डन व लुल्लानगरकडे वळवण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग – प्रिन्स ऑफ वेल रोडने किंवा भैरोबानाला – वानवडी बाजार चौक येथून इच्छित स्थळी

६) कोंढवा परीसरातून गोळीबारकडे येणाऱ्या सर्व जड मालवाहतुक वाहने, प्रवासी वाहतुक करणारी जड वाहने, एसटी बसेस, पीएमपीएमएल बसेस यांनाही मनाई करण्यात आली आहे.
पर्य़ायी मार्ग – सदर वाहनांनी लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौकाकडून इच्छित स्थळी जाणे.

याखेरीज शहरातील अन्य भागातील ठिकाणचे ईदगाह मैदानावर नमाज पठण होणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीचे परिस्थितीनुसार तेथील वाहतूक बंद किंवा अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. तरी वाहन चालकांनी पोलिसांना सहकार्य करुन संभाव्य गैरसोय टाळावी असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी केले आहे.