Paytm च्या ‘अपडेट’साठी KYC करताय मग ‘ही’ काळजी आवश्य घ्या, अन्यथा होईल मोठी ‘फसवणूक’, जाणून घ्या
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पेटीएम अन ऑनलाईन व्यवहार करताय, तर सावधान…कुठल्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका…त्यातही सध्या पेटीएम अपडेटसाठी येणारे मेसेज हे सायबर चोरट्यांकडून पाठविले जात असून, याद्वारे तब्बल 150 जणांची फसवणूक करत 18 लाख रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मेसेजनुसार पेटीएम अपडेट करताना ऑनलाईन पैसे काढून घेतले जात आहेत. त्यामुळे कोणत्याही मेसेजला उत्तर न देता पेटीएम अपडेट न करण्याचे आवाहन सायबर विभागाने केले आहे.
ऑनलाइन व्यवहारात अग्रेसर असणार्या पुणेकरांना सायबर चोरटे वेगवेगळ्या बहाण्याने फसवत आहेत. सध्या शहरात पेटीएम अपडेट न केल्यास अकाउंट बंद करण्याचा इशारा सायबर चोरट्यांकडून दिला जातोय. अनेकांकडून पेटीएम बंद होउ नये यासाठी अपडेट करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.
हीच संधी साधत सायबर चोरटे पेटीएमची गोपनीय माहिती विचारुन लाखोंचा गंडा घातला आहे. त्यामुळे शिवाजीनगर सायबर विभागात तक्रार देण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. पेटीएम कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा मेसेज पाठविला जात नाही. असे असतानाही अनेकांना पेटीएम अकाउंट अपडेटच्या नावाखाली आर्थिंक लुट केली जात आहे. त्यामध्ये बहुतांश सुशिक्षितांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.
सायबर चोरटे 24 तासात पेटीएम अपडेट केले नाही तर, तुमचे खाते बंद करण्याचा इशारा देतात. त्यामुळे भितीपोटी नागरिक अपडेट करण्यास सहमती दर्शवितात. यावेळी पेटीएमची गोपनीय माहिती घेऊन चोरटे ऑनलाईन ट्रान्झिक्शनद्वारे पैसे पळवित आहेत.
पेटीएम अपडेटच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होत असल्याचे दिसत आहे. सुशिक्षित नागरिकांचा समावेश अधिक आहे. पेटीएम अपडेटसाठी गोपनीय माहिती घेतली जाते. पेटीएम कंपनीकडून अपडेटसंदर्भात कोणालाही मेसेज पाठविले जात नाही. नागरिकांनी मेसेजला उत्तर न देता संबंधिताविषयी सायबर विभागाकडे तक्रार नोंदवावी.
जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक सायबर विभाग.