घरात आत्मा असल्याचे सांगत कर्वेनगरला ज्येष्ठ महिलेला 20 लाख रुपयांना गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – घरात आत्मा असून, तुमची मुले मरणार असल्याचे सांगत कर्वेनगरमधील एका ज्येष्ठ महिलेच्या एफडीच्या पावत्या गहाण ठेवून 20 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी महिलेच्या 45 वर्षीय मुलाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वेदिका निलेश कामत उर्फ नेहा निलेश पै (वय 38) व तिचा मित्र वीर (वय 42) यांच्या विरोधात जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नोकरीच्या निमित्ताने परदेशात असतात. त्यामुळे त्यांची आई कर्वेनगर परिसरात एकटीच राहते. त्यामुळे आरोपी वेदिका हिने फिर्यादींच्या आईशी कामाच्या निमित्ताने ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने त्यांच्या आईशी ओळख वाढविली. भाड्याने घर हवे असल्याचे सांगितले. पण, तुमच्या घरात आत्मा व भुतांचा वापर आहे. त्यामुळे तुमची मुले व तुम्ही लवकर मरणार आहेत, असे सांगत भिती दाखविली. तसेच, आईला घर दुरूस्त करावे लागेल, असे सांगितले.

त्या एकट्या राहत असल्याने आरोपींच्या गोष्टींमुळे त्या घाबरल्या. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. परंतु, आरोपींनी त्याचा फायदा घेऊन त्यांचे घर हडपण्याचे प्रयत्न सुरू केले. ज्येष्ठ महिलेच्या नावावर  बँकेत 28 लाख रूपयांचे फिक्स डिपॉझिट असल्याचे समजले. त्यावेळी आरोपींनी त्या फिक्स डिपॉझिटच्या पावत्या बँकेत गहाण ठेवल्या. त्या बदल्यात टप्प्याने वेगवेगळ्या नागरिकांच्या नावाने एकूण 20 लाख 90 हजार रूपये घेतले. फिर्यादी नोव्हेंबर महिन्यात पुण्यात आले. त्यावेळी त्यांना हा सर्व प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी आईसोबत चर्चा केली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. अधिक तपास अलंकार पोलिस करत आहेत.