CM उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुखांना मिळेना वेळ; शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कामात येताहेत अडथळा

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असं तीन पक्षाचं सरकार आहे. तर या तिन्ही पक्षामध्ये अनेक मुद्द्यावरून काहीतरी धुसफूस होत असते. तर शिवसेनाप्रमुख आणि युवासेनाप्रमुख यांच्याकडे सध्या मंत्रीपद असल्याने या दोघांना राज्य दौरा करण्यास अवघड झाले आहे. यामुळे अनेक जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कामे अपुरे पडू लागल्याचे दिसून येते. तर सोलापूरचे पालकमंत्री हे राष्ट्रवादीचे आहेत. सोलापूर पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता तेव्हा तेथे फक्त राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते उपस्थित असतात. परंतु शिवसेनेचे पदाधिकारी दिसून येत नाहीत.

सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये सहकार्य दिसून येत नाही. तेथील असणारे आजी-माजी शिवसेना पदाधिकारी यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे अशी चर्चा होत आहे. तसेच इतर पक्षातून शिवसेनेत आलेले नेते सुद्धा पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय होताना दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अतिवृष्टीच्या नुकसानीचा पाहणी दौरा सोडून इतर वेळी सोलापूर दौऱ्यावर आलेले नाहीत. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झालेले शिवसेना संपर्कप्रमुख तानाजी सावंत हे देखील पक्षाच्या असणाऱ्या बठकीत उपस्थित नव्हते. तर दुसरीकडे मात्र, पालकमंत्री वारंवार सोलापूर दौरा करत असल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य साधण्यात ते यशस्वी ठरू लागले आहे. अर्थातच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांना भेटणे हे अवघड होऊ लागले असल्याने अनेक चर्चा होऊ लागले आहे.

दरम्यान, तानाजी सावंत यांना सोलापूरचे संपर्कप्रमुख केल्यानंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह होता. परंतु विधानसभा निवडणुकीत उमेदवारी वरून मतभेद निर्माण झाल्याने त्यांच्याविरोधात नाराजी वाढली. तेव्हा पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही आणि त्यातच मोहोळ, करमाळा, शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाली. दुसरीकडे सावंत यांना मंत्रीपदाची अपेक्षा असताना त्यांना मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी सोलापूरकडे लक्ष दिले नाही अशी चर्चा होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान पक्षाने मंत्री शंकरराव गडाख यांना संपर्कमंत्री केले, मात्र काही कारणाने पुन्हा गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे संपर्कमंत्रीपद देण्यात आले. पण त्यानांही त्यांचा मतदारसंघ सोडून लक्ष देणे जमत नसल्याने आता सोलापूर जिल्ह्यासाठी सोलापूरचाच स्वतंत्र संपर्कप्रमुखाची निवड करावी अशी मागणी होत आहे.