फोन टॅपिंग प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची आगपाखड, मंत्रिमंडळाच्या बैठकीत केलं ‘हे’ मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फोन टॅपिंग प्रकरणावरून राज्यातील वातारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान या प्रकरणाचे पडसाद बुधवारी (दि. 24) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त करत मोठे विधान केले आहे.

आम्ही अधिका-यांना ओळखण्यात कमी पडलो. फोन टॅप होत असेल तर कामे करायची कशी आणि अधिका-यांवर विश्वास ठेवायचा कसा, अशा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. तसेच फडवणीसांनी केलेले आरोप आपण एकजुटीने खोडून काढले पाहिजेत, असे ठाकरे म्हणाले. आजच्या कॅबिनेटला गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणाची माहिती कॅबिनेटला दिली.

काही अधिकाऱ्यांनी गंभीर चुका केल्या असून, त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे देशमुखांनी सांगितल्याची माहिती कॅबिनेटच्या बैठकीनंतर नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. रश्मी शुक्लांनी वेगळ्याच नावांनी परवानग्या घेऊन अनेक मंत्र्यांचे फोन टॅपिंग केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.