CM उद्धव ठाकरेंच्या निर्णयाची दिल्लीतही दखल, मुख्यमंत्री केजरीवालांनी केली मोठी घोषणा (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोनाचा कहर वाढत चालला असून दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाल्याने त्या ठिकाणच्या सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. देशात महाराष्ट्रात आणि राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात झाला आहे. अनेक राज्यांकडून आर्थिक चणचण दूर करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. तसेच गरिब आणि हातावरचे पोट असणाऱ्यांसाठी अन्नधान्य मोफत दिले जात आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एप्रिल पासून एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली होती. या शिवाय अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ या प्रमाणे एक महिना मोफत अन्यधान्य देण्याची घोषणा देखील उद्धव ठाकरे यांनी केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयाची दखल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत तब्बल 72 लाख रेशन कार्ड धारकांना दोन महिन्यापर्यंत मोफत रेशन देण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे. तसेच रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रत्येकी पाच-पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा केली आहे. केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यातून ही घोषणा केली आहे.

अरविंद केजरीवाल काय म्हणाले ?

– कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे दिल्लीत लॉकडाऊन करणे आवश्यक होते. परंतु हा लॉकडाऊन गरिबांसाठी मोठं संकट ठरु शकतं. विशेषत: वेठबिगारी मजूर जे दररोज कमवतात आणि त्यात त्यांचे घर चालते, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत कठिण आहे.
– दिल्लीतील तब्बल 72 लाख रेशन कार्ड धारकांना पुढील दोन महिने मोफत रेशन मिळणार. म्हणजेच लॉकडाऊन दोन महिने चालेल असे नाही. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेतलेला आहे.
– दिल्लीतील ऑटो आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी 5-5 हजार रुपायांची आर्थिक मदत केली जाईल.
– गेल्या वर्षी लॉकडॉनमध्ये दिल्ली सरकारने 1.56 लाख वाहन चालकांना आर्थिक मदत केली होती.
– सर्वांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.