‘ड्रॅगन’ची चारही बाजूनं झाली कोंडी ! आता ऑस्ट्रेलियाच्या सेनेनं सुरू केली चीनची घेराबंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या आक्रमक वृत्ती, सायबर हल्ले आणि आर्थिक घेरावामुळे त्रस्त असलेल्या ऑस्ट्रेलियाने आता चीनविरुद्ध सैन्य उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने जाहीर केले आहे की, आता ते इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपले सैन्य बळकट करतील आणि चीनला धडा शिकवण्यासाठी नेहमी सज्ज असतील. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी बुधवारी सांगितले की, सैन्य अधिक मजबूत करण्यासाठी शस्त्रे खरेदी केली जातील आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशातील अनेक महत्त्वाच्या भागात ऑस्ट्रेलिया सैन्य व शस्त्रे तैनातही करेल.

पीएम मॉरिसन यांनी बुधवारी जाहीर केले की, चीनच्या कोणत्याही धमकीमुळे आपण घाबरणार नाही. यासाठी ऑस्ट्रेलियाने २७० बिलियन डॉलर्सची संरक्षण खरेदी योजना सादर केली आहे. पंतप्रधान म्हणाले की, ऑस्ट्रेलिया सुपर-हॉर्नट लढाऊ विमानांचा ताफा मजबूत करण्यासाठी लांब पल्ल्याच्या अँटीशिप क्षेपणास्त्रांची खरेदी करण्याच्या आणि देशाच्या संरक्षण धोरणात बदल करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मित्र देश, सहयोगी आणि मुख्य भूमीच्या संरक्षणासाठी ऑस्ट्रेलियाने असे पाऊल उचलले आहे. ऑस्ट्रेलियाचा सुपर हॉर्नेट ताफा हा नौदलाचा सर्वात मजबूत सैन्य वाहिन्यांपैकी एक मानला जातो.

चीन आणि उत्तर कोरियासाठी चालू आहे तयारी
ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या म्हणण्यानुसार, चीन आणि उत्तर कोरिया यांनी अलीकडच्या काळात अनेक लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. त्यापैकी काही तर ५५०० किमी पर्यंत मारा करण्यास सक्षम आहेत. तेव्हापासून ऑस्ट्रेलियाला बचावात्मक धोरणांतर्गत हे खरेदी करण्याची गरज आहे. नव्या घोषणेनुसार ऑस्ट्रेलिया या भूभागावरुन लाँच केल्या जाऊ शकणार्‍या लांब पल्ल्याची पृष्ठभाग ते पृष्ठभाग क्षेपणास्त्र आणि पृष्ठभाग ते हवाई क्षेपणास्त्र खरेदी करण्याबाबतही विचार करत आहे. याशिवाय हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या खरेदीबाबतही अमेरिकेशी बोलण्याची तयारी आहे. आशिया पॅसिफिक प्रदेशातील अमेरिका ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा मदतनीस आहे आणि चीनवर त्यांचा आधीच राग आहे.

भारत-चीन तणावाचाही उल्लेख
बुधवारी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी भारत-चीन सीमा वादाचा संदर्भ देत सांगितले की, काही देश विस्तारवादी धोरण स्वीकारत आहेत, त्यासाठी आता तयार राहणे आवश्यक आहे. दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्रात सतत तणाव वाढत असल्याचे मॉरिसन यांनी म्हटले. इंडो-पॅसिफिक प्रदेश वाढत्या सामरिक स्पर्धेचे केंद्र आहे, तर ऑस्ट्रेलियाला मुक्त आणि स्वतंत्र इंडो-पॅसिफिक प्रदेश संरक्षित ठेवण्याची इच्छा आहे. कोरोना विषाणूबद्दल ऑस्ट्रेलियाच्या प्रश्नांमुळे संतप्त असलेल्या चीनने आर्थिकदृष्ट्या बंदी घालणे सुरू केले आहे. अलीकडेच चीन सरकारने आपल्या नागरिकांना ऑस्ट्रेलियात न जाण्याचा सल्ला दिला होता. एवढेच नाही तर चीनने ऑस्ट्रेलियामधून आयात केलेल्या बर्‍याच वस्तूंवर बंदीही घातली आहे.