मोठा खुलासा ! चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी WHO ला ‘कोरोना’ची माहिती लपविण्याचं केलं होतं ‘आवाहन’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरस संदर्भात एक खळबळजनक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधोनाम यांना कोरोना विषाणूची माहिती लवपण्यासाठी वैयक्तिकरित्या आवाहन केले. शी जिनपिंग यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांना कोरोनाचा मनुष्यापासून मनुष्याला संसर्ग होत असल्याची माहिती जगासमोर उघड न करण्यास सांगितले होते. तसेच त्यांनी या साथीच्या रोगाविषयीची माहिती जगाला उशीराने देण्याची विनंती केली होती.

एका वृत्तानुसार, जर्मन मधील पब्लिकेशन डेर स्पीगलने याबाबत खळबळजनक वृत्त प्रकाशित केले आहे. देशातील गुप्तचर यंत्रणांच्या इनपुटच्या आधारे जर्मनीने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

21 जानेवारी रोजी जिनपिंग यांनी टेड्रॉस यांच्याशी केली बातचित

जर्मनीच्या गुप्तचर संस्था बीएनडीनुसार, 21 जानेवारीला चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांना सांगितले की, कोरोना संक्रमणाचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत असल्याची माहिती थांबवा आणि साथीच्या रोगाबाबत जगाला उशीराने सतर्क करा. जर्मनीच्या गुप्तहेर संस्थेच्या म्हणण्यानुसार चीनमुळे संपूर्ण जगाला कोरोनाबाबतची माहिती समजण्यास 4 ते 6 आठवड्यांचा विलंब झाला.

WHO हा अहवाल खोटा असल्याचे सांगितले

हा अहवाल प्रसिद्ध होताच जागतिक आरोग्य संघटनेनेही निवेदन जारी केले आहे. यामध्ये प्रसिद्ध झालेला अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने खोटा असल्याचे म्हटले आहे. तसेच पुढे म्हटले आहे की, शी जिनपिंग आणि टेड्रोस यांच्यात 21 जानेवारी रोजी बोलणे झाले नाही. ते दोघे कधीही फोनवर बोलले नाहीत. अशा अहवालाद्वारे संपूर्ण जगाचे लक्ष कोरोना साथीच्या रोगापासून भरकटवण्याचे काम केले जात आहे. तसेच आरोग्य संघटनेकडून यावर केले जात असलेल्या प्रयत्नापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, 20 जानेवारी रोजीच कोरोना विषाणूच्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमणाची माहिती चिनने दिली होती. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने 22 जानेवारी रोजी एक निवेदन जारी केले होते की वुहानच्या प्रकरणांची तपासणी केल्यानंतर कोरोना एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत असल्याची माहिती मिळाली.