चीनचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारत चीनदरम्यान तणावात वाढ झाली असून घुसखोरीसारख्या कुरापती चीनकडून सुरू आहे. 29-30 ऑगस्टला चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताच्या जवानांनी तो प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. चीनच्या जवानांनी अंधाराचा फायदा घेत भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु पुन्हा एकदा जवानांनी योग्य प्रत्युत्तर देत त्यांचा डाव उधळला आहे.

चीनी सैनिकांनी रात्रीच्या अंधारात वेशांतर करून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सतर्क भारतीय जवांनांनी चीनच्या सैनिकांना हेरत त्यांचा घुसखोरी करण्याचा डाव उधळून लावला. चीनच्या 7 ते 8 मोठ्या गाड्या चेपुझी कॅम्पवरून भारतीय सीमेच्या दिशेने येत होत्या. मात्र, जवानांनी घेरल्याचे पाहताच त्या गाड्या माघारी परतल्या असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यापूर्वी गलवान खोर्‍यातही भारत आणि चीनच्या जवानांमध्ये चकमक झाली होती.

त्यामध्ये भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले होते. तर भारतानंही प्रत्युत्तर देत चीनच्या अनेक सैनिकांना ठार केले होते. एकीकडे तणाव निवळण्यासाठी भारतासोबत चर्चा करत असलेल्या चीनने सीमेवरील आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. 29-30 ऑगस्टच्या रात्री भारत आणि चीन या दोन्ही देशाचे सैनिक आमने-सामने आल्याची माहिती समोर आली होती. यावेळी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चिनी सैन्याला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.