Pune News : ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर पुणे पोलिसांची करडी नजर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये विविध सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण, उत्सवांवर निर्बंध आले आहेत. त्यातच ख्रिसमस आणि ‘थर्टी फर्स्ट’ आला आहे. या दिवशी शहराच्या वेगेवगेळ्या भागात गर्दी होऊ नेये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नेये, यासाठी पुणे पोलिसांकडून शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पुणे शहरातील गर्दी होणारे चौक आणि प्रमुख रस्ते व परिसरामध्ये पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

पुणे शहरात ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात येते. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने पुणेकरांना स्वत:ची काळजी घेत, आनंद साजरा करावा लागणार आहे. राज्य सरकारने आजपासून महापालिका हद्दीमध्ये रात्री अकरा ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागून केली आहे. त्यामुळे नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

‘थर्टी फर्स्ट’ दिवशी अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी काहीजण पोलिसांची नजर चुकवून गर्दी करुन ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्याचा प्लॅन करत आहेत. अशा पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर असणार असून अशा पार्ट्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे शहरातील डेक्कन, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, सेनापती बापट रस्ता, कोथरुड, चांदणी चौक, कोरेगाव पार्क, विमाननगर, खराडी अशा विविध ठिकाणी पोलिसांची खास नजर राहणार आहे. नागरिकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मद्यपान करुन वाहने चालवू नयेत, यासाठीही पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करुन वाहन चालकांची तपासणी केली जाणार आहे.

RTO कडून खास खबरदारी
‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतूक होऊ नये, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) चेक पोस्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात राज्या बाहेरून किंवा अन्य शहरांतून अवैध दारूची वाहतूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरटीओ कडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करुन वाहने जप्त करण्याचा इशारा आरटीओने दिला आहे.

नियमांचे पालन करुन आनंद साजरा करा – पुणे पोलीस
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नववर्षाचं स्वागत आणि ख्रिसमससाठी संयम बाळगून नियमांचे पालन करीत आनंद साजरा करावा. पुणे पोलिसांकडून वेळ आणि नागरिकांच्या उपस्थिती संदर्भात सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य देणार आहोत, त्यासाठी पोलिसांची जादा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी सांगितले.