३ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस अधिक्षक कार्यालयातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस कर्मचाऱ्याकडून ३ हजार रुपयांची लाच स्विकारताना जालना पोलीस अधीक्षक कार्यालयातील वेलफेअरचा कनिष्ठ लिपीकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (मंगळवार) पोलीस अधीक्षक कार्य़ालयात करण्यात आली. या घटनेमुळे पोलीस अधीक्षक कार्य़ालयात खळबळ उडाली आहे.

नागसेन ज्ञानोबा पवार असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांना आईच्या शस्त्रक्रियेसाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी पोलीस कल्याण निधीच्या कर्जासाठी पोलीस अधीक्षक जालना यांच्याकडे अर्ज दिला होता. हा अर्ज वरिष्ठांसमोर ठेवण्याचे काम लिपीक पवार यांच्याकडे होते. अर्ज साहेबांसमोर ठेऊन मंजूर करून देण्यासाठी पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. तक्रारदार पोलिस कर्मचाऱ्याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.

तक्रारीनुसार पोलीस अधीक्षक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर पवार यांना एका पोलीस कर्मचाऱ्याकडून तीन हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलीस अधीक्षक जिरगे, पोलीस उपअधीक्षक रविंद्र डी. निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक काशीद, विनोद चव्हाण, कर्मचारी संतोष धायडे, प्रदीप दौंडे, संजय उद्गीरकर, गंभीर पाटील, रामचंद्र कुदर, महेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर म्हस्के, संदीप लव्हारे, रमेश चव्हाण, प्रविण खंदारे यांनी केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

माझ्या आनंदात कोणीच सहभागी झाले नाही’