… म्हणून मुख्यमंत्र्यांनी मानले सलमान खानचे आभार

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना विषाणूचे सावट असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती आहे. तर लॉकडाउन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. परंतु या काळात देशातील जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातली कर्मचारी जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. त्यामुळे अभिनेता सलामान खानने मुंबई पोलिसांमध्ये सॅनिटायझरचे वाटप केले आहे. त्याचा हा स्तुत्य उपक्रम पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सलमानचे आभार मानले आहेत.

सॅनिटायझरची मागणी वाढल्यामुळे बाजारात किंमतीही कमालीच्या वाढल्या आहेत. त्यामुळे सलमान खानने त्याच्या ‘फ्रेश’ या कंपनीत तयार करण्यात आलेले जवळपास 1 लाख सॅनिटायझर पोलिसांमध्ये वाटले आहे. त्याची ही कामगिरी पाहून मुख्यमंत्र्यांनी त्याचे आभार मानत ‘या कौतुकास्पद पुढाकारासाठी आपले आभार मानतो’, असे म्हटले आहे.

सलमान खानने अलिकडेच ‘फ्रेश’ नावाची एक कंपनी सुरु केली असून या कंपनीत तयार झालेले 1 लाख सॅनिटायझर त्याने मुंबई पोलिसांना भेट म्हणून दिले आहेत. लॉकडाउनच्या काळात घरी राहून सलमानने ही नवीन कंपनी सुरु केली आहे. या कंपनीमध्ये बॉडी स्प्रे, परफ्युम, साबण आणि सौंदर्य प्रसाधने यांची निर्मिती केली जाणार आहे. सलमानच्या फ्रेश ब्रॅण्डचे प्रोडक्ट्स लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. मात्र सध्याची परिस्थिती पाहता सॅनिटायझरची सर्वाधिक गरज असल्यामुळे फ्रेश सॅनिटायझर बाजारात उपलब्ध झाले आहे.