Lockdown in Maharashtra : उद्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंधाची (Lockdown) नवीन नियमावली? मुख्यमंत्री ठाकरे आज रात्री जनतेशी संवाद साधणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं राज्यात कडक निर्बंधासंबंधी (लॉकडाऊन) उद्या (बुधवार) नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री राज्यात अतिशय कडक निर्बंधाची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. मात्र, अतिशय कडक निर्बंधाची अंमलबजावणी नेमकी कधीपासून होणार आणि ते निर्बंध किती दिवस लागू राहणार याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. त्याबाबत मुख्यमंत्रीच जनतेला माहिती देतील असं सांगण्यात येत आहे.

राज्य सरकारनं सध्या सर्वपक्षीय बैठक, टास्क फोर्ससोबत बैठक आणि त्यापुर्वी संपादक आणि इतर तज्ज्ञांसोबतच्या बैठकांवर जोर दिला होता. दरम्यान, आरोग्य मंत्री यांनी देखील कडक निर्बंधाबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. मुख्यमंत्र्यांकडून कडक निर्बंधाची नियमावली तयार करण्याचे आदेश देखील संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आलेले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, राज्यातील सद्यस्थिती आणि उपाययोजना याबाबत सर्वांची चर्चा झाल्यानंतर राज्यात कडक निर्बंध (लॉकडाऊन) लावण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज (मंगळवार) रात्री आठ किंवा 8.30 वाजता जनतेशी सोशल माध्यमांव्दारे संवाद साधणार असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी आज अतिशय कडक निर्बंधांची घोषणा केली तरी ते निर्बंध प्रत्यक्षात मात्र 15 एप्रिलपासून लागू होतील असं देखील सांगण्यात येतं आहे. त्याबाबतची नियमावली देखील लवकरच जाहीर होईल असं सांगण्यात येतं आहे.