‘कोरोना’मुळं जीव गमावलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला 15 लाख रुपये देणार ‘ही’ सरकारी कंपनी, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) कोरोना विषाणू संसर्गामुळे जीव गमावलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची भरपाईची रक्कम देणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या निर्णयाला या महिन्याच्या सुरूवातीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे कंपनीने अधिकृत आदेशात म्हटले आहे. कंपनीत सुमारे चार लाख स्थायी व कंत्राटी कर्मचारी आहेत.

या आदेशानुसार कोल इंडिया आणि त्याच्या सहाय्यक कंपन्यांमधील कोरोना विषाणूमुळे प्राण गमावलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटूंबाला 15 लाख रुपयांची भरपाई रक्कम देण्यात येणार आहे. 24 मार्च 2020 पासून हा निर्णय लागू होईल. यापूर्वी कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले होते की कोल इंडियातील कोविड -19 मुळे जीव गमावलेल्या एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूला कामाच्या ठिकाणी अपघात म्हणून पाहिले जाईल आणि त्याच्या कुटुंबाला त्याच्या अनुषंगाने लाभ देण्यात येईल.

जूनच्या तिमाहीत कोळशाच्या ई-लिलावात 22% ने वाढ

सीआयएलने म्हटले आहे की त्यांनी एप्रिल ते जून या तिमाहीत ई-लिलावाच्या चार व्यवस्थेअंतर्गत कोळसा वाटपात 21.5 टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की या काळात 197.6 लाख टन कोळशाचा ई-लिलाव झाला. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीने 162.6 लाख टन कोळशाचा ई-लिलाव केला होता. ई-लिलावाच्या चार व्यवस्थांमध्ये कच्चा कोळसा स्पॉट ई-लिलाव, वीज उत्पादकांसाठी विशेष आगाऊ ई-लिलाव, बिगर-ऊर्जा क्षेत्रासाठी विशेष ई-लिलाव आणि स्पॉट लिलावाचा समावेश आहे.