नायजेरियन नागरिकांकडून कोकेन जप्त

मीरा रोड : पोलीसनामा ऑनलाइन – काशिमिरा पोलिसांनी मीरा रोडच्या हायटेक भागातून दोघा नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख ८० हजार रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. याआधीही पोलिसांनी काही नायजेरियन नागरिकांना विविध गुन्ह्यांत अटक केली होती.

अ‍ॅचिपाँग इमेन्युअल (वय ३७) व ओदोई ख्रिस्तोपर टोनी (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मूळचे आफ्रिकेच्या घाना येथील रहिवासी असून सध्या हाटकेशच्या थ्रीडी क्रिएशनशेजारी राहत होते. त्यांच्याकडून १ लाख ८० हजार किमतीचे १८ ग्रॅम कोकेन, दोन मोबाइल व इलेक्ट्रीक वजनकाटा जप्त केला आहे.

हाटकेश परिसरात काही वर्षांपासून नायजेरियन नागरिकांनी घातलेल्या धुमाकुळामुळे स्थानिक रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. रात्रभर चालणारा धिंगाणा, बेकायदा बार, अमली पदार्थांची विक्री व सेवन आदी विरोधात रहिवाशांनी अनेक आंदोलने केली आहेत.
रहिवाशांनी शिवसेनेच्या माध्यमातून अनेकवेळा आंदोलने केली, पोलिसांकडे तक्रारी, निवेदने दिली आहेत.

या परिसरात पोलिसांनी अनेकदा कारवाई करुन काही नायजेरियन नागरिकांना पकडले आहेत. २५ जानेवारीला पाच जणांना अटक करून अडीच लाखांचे कोकेन व पावणेतीन लाखांचे आठ मोबाइल जप्त केले होते. मुंबई पोलिसांनीही येथून नायजेरियन नागरिकांना गंभीर गुन्ह्यात अटक केली होती.