ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटातील जखमी ‘त्या’ दोघांची झुंज अखेर अयशस्वी

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन

खराडी येथील झेन्सार आयटी पार्कलगत असलेल्या रोहित्राला ११ मे रोजी सायंकाळी आग लागली होती. या आगीत पदपथावर असलेले प्रियांका झगडे (वय २४,रा.सातारा) आणि पंकज खुणे (वय २६,रा. वर्धा) गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर एक महिन्यापासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली . प्रियांका आणि पंकज यांचा मृत्यू झाल्याचे चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी सांगितले. तसेच दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल,असे पोलीस निरीक्षक मुळीक यांनी स्पष्ट केले. प्रियांका आणि पंकज हे दोघेही आय टी कंपनीत काम करीत होते.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , खराडी बाहयवळण मार्गावर झेन्सार आयटी कंपनीनजीक असलेल्या पदपथावर महावितरणचा ट्रान्सफॉर्मर आहे. दिनांक ११ मे रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास अचानक या रोहित्राचा स्फोट झाला. त्यावेळी तेथून जात असलेल्या प्रियंका आणि पंकज यांच्या अंगावर रोहित्रातील गरम आॅईल उडाल्याने ते गंभीर जखमी झाले. पदपथालगत असलेल्या सँडविच विक्रीच्या स्टॉलला देखील त्याची झळ पोहोचली. गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे दोघे महिन्याभरापासून हॉस्पिटलमध्ये उपचारा घेत होते. मृत्यूशी त्यांची झुंज अखेर अयशस्वी ठरली . उपचारादरम्यान पंकज याचा काल (दि. १५ जून ) व प्रियंका हिचा शनिवारी (दि.१६जून ) रोजी मृत्यू झाला.

महावितरणने जबाबदारी झटकली

या घटनेमध्ये गंभीर रित्या जखमी झालेल्या पंकज आणि प्रियांका यांच्यावर गेल्या एका महिन्यापासून उपचार चालू होते. उपचाराचा खर्च परवडत नसल्यामुळे अखेर पंकजच्या कुटुंबीयांनी त्याला घरी नेले. त्यांना जवळपास आठ लाख रुपयाचे रुग्णालयाचे बील आले होते. याप्रकरणी महावितरणाने मात्र जबाबदारी झटकल्याचे सूत्रांकडून कळाले आहे.