कंपन्यांमध्ये नवीन उत्पादने बाजारात आणण्याची स्पर्धा, ITC ने 5 महिन्यांत आणली 40 नवीन उत्पादने

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू देशातील पॅकेज्ड वस्तूंच्या कंपन्यांसाठी संधी घेऊन आला आहे. कोरोना काळात लोक इम्युनिटी वाढेल अशा वस्तूंची मागणी करत आहेत. एप्रिल ते ऑगस्ट या काळात या कंपन्यांनी डझनभर नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. यामध्ये भाजीपाला आणि फळ धुण्याचे वॉश तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे ज्यूस आणि हळद दूध आणि आइस्क्रीम यांचा समावेश आहे.

पॅकेज्ड फूड क्षेत्रातील देशातील तिसरी सर्वात मोठी सूचीबद्ध कंपनी आयटीसीने गेल्या ५ महिन्यांत ४० नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. यामध्ये भाज्या आणि फरशी साफसफाईची उत्पादने आणि इम्युनिटी बेव्हरेज यांचा समावेश आहे. मागील वर्षी कंपनीने एकूण ६० नवीन उत्पादने बाजारात आणली होती. आयटीसीचे अध्यक्ष संजीव पुरी यांनी गेल्या महिन्यात एजीएम येथे सांगितले होते की, ग्राहकांकडून होणारी वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी या महामारीच्या काळात इनोव्हेशनवर जोर देणार आहे. कंपनीच्या Savlon सॅनिटायझरची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन क्षमता २७५ पट वाढवली आहे.

हळदी उत्पादनांच्या लाँचमध्ये वेग
विप्रो कंझ्युमर केअर अँड लायटिंगचे अध्यक्ष अनिल चुग म्हणाले की, ‘एप्रिल २०२० पासून आमच्यासाठी नवीन उत्पादने खूप महत्त्वाची आहेत. या दरम्यान कंपनीने साबण, हँडवॉश, सॅनिटायझर्स, जंतुनाशक, अँटी-जर्म डिटर्जंट्स आणि फॅब्रिक कंडिशनर बाजारात आणले आहेत.’

आयुष मंत्रालयाने हळदीसंदर्भात दिलेल्या सल्ल्यामुळेही त्याच्या संबंधित उत्पादनांच्या लॉन्चिंगलाही वेग आला. अमूलने हळदी आईस्क्रीम आणि हळदीचे दूध लॉन्च केले. डाबरचे सीईओ मोहित मल्होत्रा म्हणाले की, ‘कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आम्ही तीन महिन्यांत ४० हून अधिक नवीन उत्पादने बाजारात आणली.’ त्याचप्रमाणे मॅरिकोने हनी, टर्मरिक मिल्क मिक्स आणि हळद-आले दूध बाजारात आणले आहे.