तुकाराम मुंढेच्या बदलीनंतर बंगल्यासमोर फटाके फोडणे महापौरांच्या अंगलट येणार 

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – प्रामाणिक आणि धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे. आता त्यांची बदली मुंबई येथे करण्यात आली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांनी त्यांना बदलीची नोटीस मिळताच कार्यालय सोडले. त्यांच्या बदलीनंतर महापौर रंजना भानसी यांच्या रामायण बंगल्यासमोर फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला होता. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या प्रकारामुळे महापौर रंजना भानसी अडचणीत येण्याची शक्यता आहे. नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात रंजना भानसी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे.

मुंढेंनी आयुक्त कार्यालय सोडल्याची बातमी कळताच, नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या बंगल्याबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भाजपा कार्यकर्त्यांनी महापौर रंजना भानसी यांच्या रामायण या बंगल्याबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला होता. मात्र, या महापौरांच्या या कृतीविरुद्ध मुंढे समर्थक एकवटले आहेत. मुंढे समर्थकांनी महापौर रंजना भानसी यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दुपारी १२ ते १ या वेळेत फटाके फोडून महापौरांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तसेच मुंढे समर्थकांनी नाशिक महापालिकेसमोर भाजपविरुद्ध घोषणाबाजी केली.

दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनीही मुंढेंच्या बदलीवर समाधान व्यक्त केल आहे. नगरसेवकांसोबत मुंढेचा वाद असल्याचे मान्य करताना, नगरसेवकांनी केलेली कामे मुंढेंनी रद्द केल्याचं भानसी यांनी म्हटले. तसेच मुंढेंच काम हे हिटलरशाहीप्रमाणे सुरू होते, त्यामुळे आम्ही त्यांच्या बदलीची मागणी केली होती, असेही भानसी यांनी म्हटले होते.