गायींना ओढत आणलं, राजू शेट्टींसह 50 जणांवर बारामतीत FIR दाखल !

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन –   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकत्रित जमाव जमवू नये असे आदेश दिले आहेत. तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या आदेशाचं उल्लंघन करून मोर्चा काढला. इतकंच नाही तर या मोर्चासाठी आणलेल्या जनावरांचेही प्रचंड हाल केले. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह प्रमुख 11 आयोजक व इतर 40 ते 50 जणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंकार कैलास सिताप या पोलीस कर्मचाऱ्यानं यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माजी खासदार राजू शेट्टी, अमरसिंह कदम (रा हिंगणेवाडी ता इंदापूर), विलास विनायक सस्ते (रा खांडज ता बारामती), महेंद्र जयसिंग तावरे (रा सांगवी ता बारामती), विकास उर्फ नानजी बाबर (रा पिंपळी, ता बारामती) धनंजय महामुलकर (रा. फलटण जि सातारा), सचिन खानविलकर (रा नामवैभव टॉकिजशेजारी फलटण, जिल्हा सातारा), डॉ राजेंद्र घाडगे (रा चौधरवाडी ता फलटण), बाळासो शिपकुले, सिवाजी सोडमिसे (दोघे राह. सोमंथळी ता फलटण), राजाभाऊ कदम (रा दौंड, शुगर कारखान्याजवळ, ता दौंड) बुधम मुशक शेख (रा सणसर, ता इंदापूर) व अन्य 40 ते 50 स्वाभिमानीचे कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 143, 145, 149, 188, 341, 269, 270 सह साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम, प्राण्यांचे अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत उल्लेख केल्यानुसार, फिर्यादीला स्वाभिमानीच्या दूध दरवाढ आंदोलनाची माहिती सोशल मीडियाद्वारे तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून समजली. त्यानुसार शहर पोलीस अधिकाऱ्यांमार्फत योग्य तो बंदोबस्त लावण्यात आला. दुपारी 1 वाजताच्या सुमारास स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी व त्यांचे कार्यकर्ते शारदा प्रांगणाजवळ एकत्र जमले. शेख यांनी एमएच 42 व एमएच 7471 या पिकअप वाहनातून 3 गायी दाटीवाटीनं मोर्चासाठी बसवून आणल्या होत्या. कार्यकर्त्यांच्याही तोंडाला मास्क नव्हते. याशिवाय त्यांनी सोशल डिस्टेंसिंगचंही पालन केलं नाही असंही फिर्यादीत म्हटलं आहे.

पुढे असा उल्लेख आहे की, सर्व लोक मोठमोठ्यानं दूध दरवाढीसंबंधी घोषणा देत येत होते. पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याची नोटीस राजू शेट्टी यांना बजावली. मोर्चा काढू नये असंही त्यांना सांगण्यात आलं. तरी देखील मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या पुढील बाजूस दोन गाईंना दोरीनं ओढत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यानंतर प्रशासकीय इमारतीच्या गेटसमोर बेकायदा गर्दी, जमाव जमवत घोषणाबाजी करण्यात आली. तसंच भाषणंही झाली. यानंतर प्रांताधिकार्यांना निवेदन देण्यात आलं.

फिर्यादीत नमूद केलंय की, मोर्चा व सभेदरम्यान रस्त्यानं ये जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण करण्यात आला. त्यामुळं वाहतूक कोंडी देखील झाली. कोरोना विषाणूच्या स्थितीत हयगयीचे व मानवी जीवितास धोका होईल अशी घातकी कृती करण्यात आली. प्राण्यांना क्रूरतेनं वागवण्यात आलं. दुपारी 3.30 वाजता मोर्चा संपल्यानंतर वरिष्ठांशी चर्चा करून फिर्याद देत असल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे.