दौंड तालुक्यातील रेल्वेची कामे तातडीने पूर्ण करा : सुप्रिया सुळे

दौंड: पोलीसनामा ऑनलाइन – पुणे ते दौंड रेल्वे मार्गावरील विविध स्थानके आणि गावांमध्ये तसेच लोहमार्गावरील उड्डाणपूल, भुयारी मार्ग, सर्व्हिस रस्ते, प्लॅटफॉर्म दुरुस्ती आणि अन्य कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी  रेल्वे बोर्डाकडे केली आहे.

बोर्डाचे चेअरमन अश्वानी लोहानी यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. विविध मागण्यांबरोबरच दौंड रेल्वे स्थानक परिसरातील मंदिर सोलापूर विभागीय रेल्वे नियंत्रकांनी सील केले आहे. ही कारवाई पाहता तेथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही परिस्थिती येऊ नये यासाठी तातडीने योग्य तो निर्णय घेऊन कारवाही करावी, असे सुळे यांनी म्हटले आहे. ब्रिटिश कालावधीत रेल्वेसाठी वापरण्यात येणारे वाफेवरील इंजिन दौंड रेल्वे स्थानकावर दर्शनी जागेत बसवावे. त्यामुळे ऐतिहासिक ठेव्याचे जतन होण्याबरोबरच स्थानकाच्या सौंदर्यातही भर पडू शकते.

याशिवाय दौंड तालुक्यातील सहजपुर, कासुर्डी, यवत, खुटबाव, कडेठाण, पाटस, सोनेवाडी, खुरवाडी, भिरवडे आणि पुढे भिगवण याठिकाणी लोहमार्गावर उड्डाणपुलांची गरज आहे.  तसेच सहजपुर आणि कासुर्डी येथे  प्रवाशांची संख्या मोठी असल्याने स्वतंत्र रेल्वे स्थानक करण्याची गरज आहे, ही बाब सुळे यानो अश्वानी लोहानी यांच्या लक्षात आणून दिली.

नीरा स्थानकाजवळ जागा द्या, आम्ही बाग फुलवू
नीरा रेल्वे स्थानकाजवळ असलेली मोकळी जागा बाग विकसीत करण्यासाठी आपल्याला भाडेतत्वावर उपलब्ध करून द्यावी. तेथे बाग केल्यास रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यात भर पडेल. शिवाय नीरा-जेजुरी रेल्वे मार्गावर जेजुरी येथे खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येतात. त्यांच्यासाठी जेजुरी येथे भुयारी मार्गाची गरज असून सुकळवाडी येथे मशिदीत प्रार्थना करण्यासाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठीही भुयारी मार्ग तयार करण्याची गरज आहे, असे सुप्रिया सुळे यांनी लोहानी यांना सांगितले असून त्यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.