कॉंग्रेसचे कट्टर कार्यकर्ते रामभाऊ बराटे यांचे निधन

वारजे माळवाडी : पोलीसनामा ऑालनाइन – पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम, आरोग्य समितीचे माजी सभापती रामभाऊ बाबासाहेब बराटे (वय 70) यांचे हृदयविकाराने शुक्रवारी (दि. 4) रात्री निधन झाले. त्यांच्यामागे दोन विवाहित भाऊ, पत्नी, दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरेदेखील झाले होते. परंतु हृदयविकाराच्या आजारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यातच त्यांचे निधन झाले. कोरोनापूर्वी वारजे जकातनाका परिसरात झालेल्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. तो त्यांच्या सामाजिक जीवनातील शेवटचा कार्यक्रम ठरला.

रामभाऊ हे कॉंग्रेसचे आणि माजी शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांचे कट्टर समर्थक होते. सध्याचे हवेली तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन बराटे यांचे ते वडील होत. वारजे गावचे माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, कॉंग्रेसच्या विविध पदावर त्यांनी काम केले आहे. सरपंच असताना वारजे गावासाठी दर माणसी 100 लिटर पाणी योजना राबवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी खडकवासला धरणातून बंद जलवाहिनीतून पाणी आणून जलशुद्धीकरण केंद्र अशी योजना पूर्ण केली. वारजेतील वाहतूक व्यवस्था आणि अतिक्रमण यावर ते आग्रहाने नेहमी बोलत असत. तसेच खानापूर येथे प्रा. आरोग्य केंद्र उभारणे, वारजे परिसरात ओढ्यावर पूल बांधणे आदी कामांसाठी तसेच वारजे विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता.

You might also like