पुण्याच्या मेट्रो बाबत बोलण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नाही : भाजप नेते सुहास कुलकर्णी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात पुण्याच्या विकासाचे मेट्रो, विकास आराखडा, नदी सुधारणा असे अनेक प्रकल्प रखडले होते. ते भाजप-शिवसेनेच्या सरकारने मार्गी लावले त्यामुळे यश, अपयश देण्याचा नैतिक अधिकार पुण्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना राहिलेला नाही असे प्रत्युत्तर पुणे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुहास कुलकर्णी यांनी काँग्रेसला दिले आहे.

नागपूरची मेट्रो सुरू झाली पण, पुण्याची नाही अशी टीका काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे त्याला उत्तर देताना कुलकर्णी म्हणाले, सन २००८ ते २०१४ साल पर्यंत मेट्रोची फाईल मंजुरीसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात फिरत राहिली त्यावेळी काँग्रेसचेच आमदार, खासदार होते तेव्हा या काँग्रेसच्या आमदारांनी काय पाठपुरावा केला ? आम्ही सत्तेत आल्यावर मेट्रोचे काम धडाडीने मार्गी लावले. आज मोठमोठे खांब उभे राहिले आहेत. ठरलेल्या मुदतीत मेट्रो धावू लागेल आणि सगळे पुणेकर त्याचे साक्षीदार आहेत. पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) या संस्थेला दहा वर्षात काँग्रेसला अध्यक्ष नेमता आला नाही त्यावेळी हे काँग्रेसचे आमदार, खासदार काय करत होते ? ते निष्क्रीय होते किंवा एकमेकात भांडत होते. पुणे शहराच्या मध्यवस्तीचा विकास आराखडा दहा वर्षे रेंगाळला, अंतर्गत रिंगरोडचे काम २५वर्षे रखडले तेव्हा ही आमदार, खासदार मंडळी काय करत होते ? शहर विकासासाठी तेव्हा का नाही भांडले ? तेव्हा टीका का नाही केली ? असे कुलकर्णी म्हणाले.

भाजप-शिवसेना युती सरकार सत्तेत आल्यावर मेट्रो च्या दोन मार्गांचे काम वेगाने सुरु झाले त्यामुळे काँग्रेस नेत्यांची टीका अवाजवी आहे. शिवाजी नगर ते हिंजवडी ह्या तिसऱ्या मार्गाचे कामही युती सरकारने हाती घेतले आहे. पीएमआरडीए स्थापना करून विकास आराखड्याचे कामही अंतिम टप्प्यात आलेले आहे. रिंगरोडच्या कामालाही मुख्य मंत्र्यांनी चालना दिली आहे. भाजप खासदार आमदारांच्या चिकाटीच्या पाठपुराव्यामुळे मेट्रो, अंतर्गत रिंगरोड, पुरंदर विमानतळ, उड्डाणपूल, जुन्या वाड्यांचा विकास, नदी सुधारणा अशी शहर विकासाची सर्वांगीण कामे प्रगतीपथावर आहेत आणि पुणेकरांना ती दिसतही आहेत असे कुलकर्णी यांनी सांगितले.