काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्यासह 9 उमेदवारांचे अर्ज दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र घेण्यासाठीही सोमवारी इच्छुकांनी गर्दी केली. विविध मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून नेली. आज संगमनेर मतदारसंघात विजय उर्फ बाळासाहेब थोरात (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस) आणि बापू पाराजी रणधीर यांनी अर्ज दाखल केले. कोपरगाव मतदारसंघात विजय सूर्यभान वहाडणे आणि शिवाजी पोपटराव कवडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. श्रीरामपूर मतदारसंघात भाऊसाहेब शंकर पगारे यांनी एमआयएम आणि अपक्ष असे अर्ज सादर केले. नेवासा येथे कारभारी विष्णू उदागे (अपक्ष) आणि शंकरराव यशवंतराव गडाख (क्रांतीकारी शेतकरी पार्टी) यांनी अर्ज दाखल केले. अहमदनगर (शहर) मतदारसंघात श्रीराम जनार्दन येंडे आणि श्रीधर जाखुजी दरेकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केले.

२१६-अकोले (अनुसूचित जमाती) मतदारसंघात सोमवारी १० जणांनी १३ अर्ज नेले. २१७-संगमनेर विधानसभा मतदारसंघात एकूण १७ जणांनी ३० नामनिर्देशनपत्रे नेली. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांनी ४ आणि बापू पाराजी रणधीर यांनी २ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत. २१८-शिर्डी मतदारसंघात २३ जणांनी ३६ अर्ज नेले. २१९-कोपरगाव मतदारसंघात २७ उमेदवारांनी ४७ अर्ज नेले तर दोघाजणांनी अर्ज दाखल केले. २२०-श्रीरामपूर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातही ३९ जणांनी ५९ नामनिर्देशनपत्रे नेली. भाऊसाहेब शंकर पगारे यांनी एमआयएम आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले.

२२१-नेवासा मतदारसंघात २ व्यक्तींनी ४ अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली तसेच १९ जणांनी आज ३० नामनिर्देशनपत्रे नेली असल्याची माहितीही त्यांनी दिली. २२२-शेवगाव मतदारसंघात १६ जणांनी ३४ अर्ज नेले. २२३-राहुरी मतदारसंघात आज एकाही इच्छुकाने अर्ज नेला नसल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली. २२४ – पारनेर २० व्‍यक्‍तींनी ३६ अर्ज नेले. २२५ -अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघात एकुण २१ लोकांनी ३० अर्ज नेले. २२६ -श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात आज एकुण २४ लोकांनी २५ अर्ज नेले. २२७ -कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात आज एकुण १३ लोकांनी ३१ अर्ज नेले.

Visit : policenama.com