राज्यपालांचं वर्तन गीनिज बुकमध्ये नोंद करण्यासारखं, वडेट्टीवारांची घणाघाती टीका

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरं खुली करण्याच्या मागणीसंदर्भात एक पत्र लिहिलं. यावरून काँग्रेसचे नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. राज्याच्या राज्यपालांच्या वर्तनाची नोंद गीनीज बुकमध्ये करण्यासारखी असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विद्यमान राजपालांइतकी वादग्रस्त भूमिका आतापर्यंत कोणत्याही राज्यपालांनी घेतलेली नव्हती. त्यांनी ज्या रंगाचा, ज्या भावनेचा, ज्या विचारांचा चष्मा घातला आहे, तो त्यांनी काढावा, अशी महाराष्ट्राची भूमिका असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

पत्रात नेमकं काय आहे ?
भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या पत्रातून मुख्यमंत्र्यांना रामभक्तीची आठवण करुन दिली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच तुम्ही आयोध्येचा दौरा केला होता. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजा केली होती, असं कोश्यारी यांनी पत्रात लिहलं आहे. तुम्ही स्वत:ला रामभक्त, हिंदुत्ववादी म्हणवता. मग आता तुम्हाला मंदिरं खुली करण्यासाठी काही दैवी संकेत मिळत आहेत का, असा खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तुम्हाला सेक्युलर शब्दाचा तिटकारा होता. मग आता तुम्ही अचानक सेक्युलर झालात का ? असाही प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता.

राज्यपाल कोश्यारींच्या पत्राबद्दल अमित शहांची नाराजी
राज्यातील मंदिरे खुली करण्यात यावीत यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. हे पत्र खुपच वादग्रस्त ठरले होते. यातील आक्षेपार्ह भाषेमुळे राज्यपालांवर मोठी टीका झाली होती. आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या पत्राबाबत भाष्य केले असून कोश्यारी यांनी ते शब्द टाळायला पाहिजे होते, असे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अमित शहा बोलत होते.

मंदिरे खुली करण्याबाबत राज्य सरकार उशीर करत असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. यात कोश्यारी यांनी म्हटले होते की, तुम्ही आता अचानक सेक्युलर झाला आहात की काय? राज्यपालांच्या याच वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. याच वक्तव्यावरुन अमित शहा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, राज्यपालांनी काही शब्द टाळले असते तर बरे झाले असते.