असंतोषाचं वातावरण असतानाच गुलाम नबी आझाद यांचा ‘या’ कारणावरून पक्षाला घरचा आहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पक्षावर केलेल्या टीकेमुळे असंतोषाचं वातावरण असतानाच गुलाम नबी आझाद यांनी निवडणुकांमध्ये होणाऱ्या पराभवावरून पक्षाला घरचा आहेर दिला आहे. आजच्या नेत्यांची सर्वांत मोठी समस्या ही आहे की पक्षाकडून तिकीट मिळाले, की ते सर्वप्रथम पंचतारांकित हॉटेल बुक करतात, असा घणाघात आझाद यांनी केला होता. त्यावरून आता आझाद यांच्यावर टीका होत आहे.

हरियाणा काँग्रेसचे आमदार तथा युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव चिरंजीव राव यांनी गुलाम यांना पक्षातून ‘आझाद’ करा, अशी थेट मागणी केली आहे.

तर दुसरीकडे ‘आझादजी, ज्यावेळी आमचे नेते राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेते कठीण काळात रस्त्यावर उतरले होते, तेव्हा तुम्ही कुठे होतात? अशा संधीसाधू नेत्यांना तात्काळ पक्षातून काढून टाकण्याची विनंती काँग्रेस नेतृत्वाला आहे’ असे ट्विट उत्तर प्रदेश काँग्रेस मीडिया प्रभारी ललन कुमार यांनी केलं आहे.

काय म्हणाले होते आझाद ?
बिहार विधानसभा निवडणुकीच्या खराब कामगिरीबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, निवडणुकीतील पराभवाची चिंता सर्वांनाच आहे. आमच्या लोकांचा ग्राउंड लेव्हलवर जनतेशी संपर्क तुटला आहे. पराभवासाठी मी पक्षाच्या नेतृत्वास दोष देत नाही. मात्र, पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांचा तळागाळातील संपर्क कमी झाला आहे.

जनतेने पक्षावर प्रेम केले पाहिजे. मागील ७२ वर्षांत काँग्रेस नीचांकी पातळीवर आहे. पंचतारांकित संस्कृतीने निवडणूक जिंकल्या जात नाहीत. आजच्या नेत्यांची सर्वांत मोठी समस्या ही आहे की पक्षाकडून तिकीट मिळाले, की ते सर्वप्रथम पंचतारांकित हॉटेल बुक करतात, अशी टीका करत, जर एखादा ओबडधोबड रास्ता असेल, तर ते तिथे जात नाहीत. पंचतारांकित संस्कृती सोडण्याची वेळ आता आली आहे. आपण ती सोडत नाही तोपर्यंत कोणतीही निवडणूक जिंकता येणार नाही, असेसुद्धा आझाद यांनी खडसावले होते.