‘राहुल गांधींनी 6 महिन्यांपूर्वीच दिला होता इशारा’, GDP वरून प्रियांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या संकट काळात जगाच्या अर्थव्यवस्थेवर संकट आलं आहे. त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम दिसून आला आहे. देशाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी 23.9 टक्क्यांनी घसरल्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे. यावरून आता काँग्रेसनं केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. प्रियंका म्हणतात, “6 महिन्यांपूर्वीच राहुल गांधी यांनी आर्थिक त्सुनामीबद्दल सांगितलं होतं. कोरोना संकट काळात हत्तीच्या दातांसारखे दाखवणारे एक पॅकेज घोषित झाले. मात्र आजची स्थिती पहा. जीडीपी @-23.9 टक्के. भाजप सरकारनं अर्थव्यवस्थेला बुडवलं.” असं प्रियंका म्हणाल्या आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीडीपीवरून घेरलं होतं. राहुल गांधी ट्विट करत आपलं म्हणणं मांडलं होतं. ते म्हणाले होते की, “जीडीपी 24 टक्के घसरला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घसरण आहे. प्रत्येक इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणं हे सरकारचं दुर्दैव आहे.”

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “मोदीजी आता तरी मान्य करा ज्याला तुम्ही मास्टर स्ट्रोक म्हणाले तो आपत्ती स्ट्रोक ठरला होता. नोटाबंदी, चुकीची जीएसटी आणि देशबंदी (लॉकडाऊन)” असंही सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.