राज्यात 3 आठवड्यांचा कडक Lockdown ?, विजय वडेट्टीवरांचं मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मागील काही दिवसांत कोरोनाच्या संसर्गाचा वेग वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात कठोर निर्बंध लागू करुन विकेण्ड लॉकडाऊन जाहीर केला आहे. परंतु राज्य सरकारच्या निर्णयाला विरोधकांनी आणि राज्यातील व्यापाऱ्यांनी विरोध केला असून निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

राज्यात आज सायंकाळपासून विकेण्ड लॉकडाऊन सुरु होत असून त्यासंबंधी विचारले असता, वडेट्टीवार म्हणाले, विकेण्ड लॉकडाऊनची गरज होती. रुग्णसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे हा आकडा पुढील 10 दिवसांमध्ये महाराष्ट्रात 10 लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. यामुळे अशा परिस्थितीमध्ये पूर्ण लॉकडाऊन करावा लागेल. रेल्वेवर निर्बंध आणावे लागतील, गर्दी कुठेही होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

वडेट्टिवार पुढे म्हणाले, परिस्थिती हातळण्यासाठी कितीही उपाययोजना केल्या तरी मनुष्यबळ कमी पडणार आहे. डॉक्टर, नर्सेस कमी पडणार आहे. जे साडे चार हजार डॉक्टर अंतिम परीक्षा उत्तीर्ण होणार आहेत, त्यांना राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी कामाला लावत आहोत. तरी देखील मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे विकेण्ड नाही तर मुख्यमंत्र्यांना तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लावण्यास सांगणार असल्याचे, वडेट्टिवार यांनी सांगितले.

लॉकडाऊन केल्याशिवाय निरपराध लोकांचे प्राण वाचणार नाहीत. कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असून कोरोनाला रोखण्यासाठी पूर्णत: लॉकडाऊनची आवश्यकता असल्याचे सांगत आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत की तीन आठवड्यांचा लॉकडाऊन करा. काँग्रेसचा मंत्री नाही तर आपत्ती व्यवस्थापन खात्याचा मंत्री म्हणून राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि केंद्राकडून जी सापत्न वागणूक मिळत आहे, त्यामुळे ही मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.