पोलीसांना बनावट नोटांचा छापखाना सापडला ; नाशिकसह हैदराबादपर्यंत कनेक्शन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – जिन्सी परिसरात बनावट नोटांचा छापखाना पोलिसांना सापडला असून यातील दोन्ही आरोपी सराईत आहेत. मास्टरमाइंड असलेल्या शोहरत अली याच्याविरुद्ध मुंबईत दोन गुन्हे दाखल असून ही टोळी बनावट नोटांसह गुप्तधन काढून देणे, पैशांचा पाऊस पाडणे आणि मांडूळ तस्करीतही सहभागी आहेत. या बनावट नोटांचे कनेक्शन नाशिकसह हैदराबादपर्यंत पसरलेले आहे.

औरंगाबादमधील रोशनगेट परिसरातील बारी कॉलनीत अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या बनावट नोटांच्या छापखाण्यावर जिन्सी पोलिसांनी छापा मारून शेख हारुण शेख बशीर याच्यासह शेख शोहरत अली याला अटक केली. या दोघांच्या ताब्यातून ४४ हजारांच्या बनावट नोटा, दोन प्रिंटर, कोरे बॉण्ड पेपर आणि दहा हजारांच्या खऱ्या नोटा जप्त केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गोरखधंद्यामागे मोठी टोळी सक्रिय आहे. नोटांमध्ये वापरण्यात येणारे वॉटर मार्कही त्यांना पुरविण्यात येत होते. त्याच्या मुळापर्यंत पोहोचणे औरंगाबाद पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे.

टोळीतला शेख हारुण शेख बशीर हा मूळ फुलंब्री तालुक्यातला राहणारा असून तो साथीदारांसह गुप्तधन काढून देणे, पैशांचा पाऊस पाडणे आणि गुप्त धनासाठी लागणाऱ्या मांडुळाची तस्करी करत असल्याचे समजते. यापूर्वी क्रांती चौकात पकडल्या गेलेल्या वाघाची कातडी तस्करीत शेख हारुणचा सहभाग होता. शिवाय, दोन महिन्यांपूर्वी वाळूज औद्योगिक वसाहतीतील मांडुळाची तस्करीतही त्याचा हात होता, मात्र तो निसटल्याने बचावला होता. पोलिसांनी पैशांचा पाऊस पाडणाऱ्या आणि मांडुळाची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केल्याने दोघांनी बनावट नोटांचा छापखाना सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती करण्यात आली. सुनावणीअंती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रोहिना अंजुम यांनी व्यापारी शेख हारुण शेख बशीर (३८, रा. बारी कॉलनी) आणि सय्यद शोहरत असगर अली (२५, रा. रहेमानिया कॉलनी) या दोघांना २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.